Friday, October 18, 2013

तुझी आठवण सदैव येते


तुझ्यात नकळत किती गुंतले
तुला न होती खबरबातही
तुझी आठवण सदैव येते
हप्त्याचे दिन रात्र सातही

विरही अश्रू जगास दिसती
जखम वाहते अंतरातही
हास्य उमलते तुझ्या सोबती
रखरखणार्‍या उन्हाळ्यातही

आयुष्याच्या वळाणावरती
संग तुझा, हातात हातही
झपाटले प्रेमात तुझ्या रे !
तुझेच असते गात गीतही

तुफान, वादळ आले होते
संथ माझिया जीवनातही
दीपस्तंभ तू मला भेटता
नौका तरली सागरातही

नसेल जर का प्रेम प्राक्तनी
मैत्रीची चालेल साथही
तुला सावली सदैव देण्या
उभी खुशीने मी उन्हातही

नकोस समजू दुबळी मजला
तुला सोडले मुक्त यातही
कैद करू मी शकले असते
नजरकडांच्या काजळातही

बुलंद माझे किती इरादे !
भिजेन म्हणते मृगजळातही
धावत असते, पडते, उठते
अंकुरते मी कातळातही

प्रेमरोग हा असाच असतो
झिंग वाटते वेदनेतही
हिशोब कसला? काय गवसले
सर्व मिळवले हरवण्यातही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


No comments:

Post a Comment