Monday, October 14, 2013

घेतले जडवून होते


लागले नव्हते मला पण
घेतले जडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

ध्यास वेडा लागला अन्
जीवना आली उभारी
पंख नसुनी घेत होतो
ऊंच आकाशी भरारी
मुक्त उडताना तिच्याशी
घेतले जखडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सांगता आले न तिजला
मी कधी सांगू न शकलो
बोलक्या डोळ्यात आम्ही
भाव वाचायास शिकलो
दार दोघांनी मनाचे
पाहिले उघडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सदगुणी नव्हतो जरी मी
राहिलो परिघात एका
प्रेमरंगी रंगताना
भीत होतो एकमेका
मज तिने नजरेत अपुल्या
बांधले पकडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

बेगडी दुनियेत सखये
वास्तवाला शोधताना
संभ्रमित झालो, फुले मी
कागदांची हुंगताना
चेहरे असली कमी अन्
खूपसे मढवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

प्रेम विश्वासास आहे
नाव दुसरे ठेवलेले
हे न जर जमले कुणाला
विश्व त्याचे भंगलेले
संशयाचे भूत आम्ही
लावले उडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment