Friday, October 25, 2013

उशीर झाला


दिला आवळा का नेत्याने?
उमजायाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

पाच पाच वर्षांनी येती
राजकारणी भीक मागण्या
जुन्या योजना पुन्हा नव्याने
सांगत आम्हा भुरळ घालण्या
विकास त्यांचा दैन्य आमुचे 
कळावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कल्याणाच्या सर्व योजना
नाव जोडले नेहरू, गांधी
सावरकर, जयप्रकाश म्हणता
संतापाची येते आँधी
एक घराणे=प्रजातंत्र हे
पचावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

किती खर्चले? कितॉ चोरले?
दिलाच नाही हिशोब कोणी
मिटक्या मारत कुणी चाटले?
गरिबांच्या टाळूचे लोणी
षंढ प्रजेला यक्षप्रश्न हे
पडावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

श्राध्द कराया, भारत देशा !
राजकारणी सज्ज जाहले
डोंबकावळे पूर्वज त्यांचे
आत्मे गगनी फिरू लागले
अतृप्तीने पिंड कावळा
शिवावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कवी, शायरांनो बस आता
तो अन् ती च्या रटाळ कविता
शोधा स्फुल्लिंगांची वस्ती
रान पेटवा क्रांतीकरिता
फुंकर मारा राख उडवण्या
धगधगायला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, October 22, 2013

एक प्रतिक्षा ना सरणारी


शोध घ्यायच्या अधीच थकली
नजर बिचारी भिरभिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

प्रीत काय हे कळण्याआधी
तिची जिवाला ओढ लागली
दंगा, मस्ती शाळेमध्ये
सहवासाची जोड लाभली
मनात रुजली हलके हलके
एक भावना शिरशिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

काय हवे मज तिच्यापासुनी
मला कधी ना कळले होते
कधी भेटता, तिच्या दिशेने
डोळे हटकुन वळले होते
निमंत्रणाविन अजून येते
तिची आठवण दरवळणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

एक कोपरा तिने व्यापला
अंतरातला खास मखमली
सदा नांदते बहार तेथे
रूप खुलविते तिचे मलमली
वादळातही मनी तेवते
मंद ज्योत ती थरथरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

बघता बघता शाळा सरली
मार्ग आपले किती बदलले !
मला उशीरा कळून आले
जपावयाचे तेच हरवले
कायमची ही खंत मनाला
सांजसकाळी कुरतडणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

अंतक्षणीही आयुष्याच्या
एक अधूरे स्वप्न असावे
एकच नाते, पोत रेशमी
काच जिवाला, तरी हसावे
नको पिंड, मज हवी शिदोरी
अंतःकरणी मोहरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, October 18, 2013

तुझी आठवण सदैव येते


तुझ्यात नकळत किती गुंतले
तुला न होती खबरबातही
तुझी आठवण सदैव येते
हप्त्याचे दिन रात्र सातही

विरही अश्रू जगास दिसती
जखम वाहते अंतरातही
हास्य उमलते तुझ्या सोबती
रखरखणार्‍या उन्हाळ्यातही

आयुष्याच्या वळाणावरती
संग तुझा, हातात हातही
झपाटले प्रेमात तुझ्या रे !
तुझेच असते गात गीतही

तुफान, वादळ आले होते
संथ माझिया जीवनातही
दीपस्तंभ तू मला भेटता
नौका तरली सागरातही

नसेल जर का प्रेम प्राक्तनी
मैत्रीची चालेल साथही
तुला सावली सदैव देण्या
उभी खुशीने मी उन्हातही

नकोस समजू दुबळी मजला
तुला सोडले मुक्त यातही
कैद करू मी शकले असते
नजरकडांच्या काजळातही

बुलंद माझे किती इरादे !
भिजेन म्हणते मृगजळातही
धावत असते, पडते, उठते
अंकुरते मी कातळातही

प्रेमरोग हा असाच असतो
झिंग वाटते वेदनेतही
हिशोब कसला? काय गवसले
सर्व मिळवले हरवण्यातही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Thursday, October 17, 2013

हजारो कालची स्वप्ने


तुझी होती न माझी ती
खरे तर आपुली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

तर्‍हा प्रेमातली न्यारी
न बोलावे न ऐकावे
सखीच्या डोळियांमधुनी
मनीचे भाव वाचावे
न जखमा ना कुठे खपल्या
न भळभळ वाहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

भविष्याची किती चित्रे
मनी रेखाटलेली ती
किती उर्मी जगायाची
उरी झंकारलेली ती
जशी सरली निशा, स्वप्ने
अधूरी राहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

जरी घरटे तसे छोटे
सुखाचे नांदणे होते
कधी नव्हती अमावास्या
बरसले चांदणे होते
तुझे नसणे जरासेही
मनाची काहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

वरोनी गाज अन् लाटा
तरी नाही कधी भ्यालो
दधीच्या बाह्य रूपाच्या
मुळाला मी जरा गेलो
सखीच्या मनतळावरती
सुखाची सावली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

कहाणी आपुली लिहिण्या
नको कागद नको शाई
मनावर कोरले जे, ते
लिहाया का उगा घाई?
वजावटही तुझ्यासंगे
सजावट भासली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, October 14, 2013

घेतले जडवून होते


लागले नव्हते मला पण
घेतले जडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

ध्यास वेडा लागला अन्
जीवना आली उभारी
पंख नसुनी घेत होतो
ऊंच आकाशी भरारी
मुक्त उडताना तिच्याशी
घेतले जखडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सांगता आले न तिजला
मी कधी सांगू न शकलो
बोलक्या डोळ्यात आम्ही
भाव वाचायास शिकलो
दार दोघांनी मनाचे
पाहिले उघडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सदगुणी नव्हतो जरी मी
राहिलो परिघात एका
प्रेमरंगी रंगताना
भीत होतो एकमेका
मज तिने नजरेत अपुल्या
बांधले पकडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

बेगडी दुनियेत सखये
वास्तवाला शोधताना
संभ्रमित झालो, फुले मी
कागदांची हुंगताना
चेहरे असली कमी अन्
खूपसे मढवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

प्रेम विश्वासास आहे
नाव दुसरे ठेवलेले
हे न जर जमले कुणाला
विश्व त्याचे भंगलेले
संशयाचे भूत आम्ही
लावले उडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, October 12, 2013

असे नेहमी वाटायाचे


प्रजक्ताच्या पायघड्यांवर
ठसे तुझ्या दिसता पायाचे
सुगंधात तू लपली असशिल
असे नेहमी वाटायाचे

सतेज कांती, रूप नशीले
मनी ठरवले वहावयाचे
माझ्यापासुन स्वतःस आता
तुलाच आहे जपावयाचे

वसंतासही वेड लागले
स्वप्न नव्याने फुलवायाचे
तुझ्या चेहर्‍यावरती म्हणतो
रंग हजारो उधळायाचे

मैफिलीतली शमा असोनी
सोड इरादे जळावयाचे
तुला शायरीमधून माझ्या
अजून आहे मिरवायाचे

असूनही नसल्यासमान का
ठरवलेस तू असावयाचे?
जरी चांदणे पांघरतो मी
कसे ओंजळी भरावयाचे?

खाचा, खळगे मला, मखमली
गवतावर तू चालायाचे
दूर पाहता तुला सुखी, मी
मनी खुशीने हुरळायाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, October 10, 2013

हवाहवासा गुदमर आहे


जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा
ओझे झाले मणभर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


अंधाराचा मी रहिवासी
किती कवडसे गडे धाडता?
ओबडधोबड व्यक्तित्वाला
अगणित पैलू तुम्ही पाडता
शब्द फुटेना व्यक्त व्हावया
ओठावरती थरथर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

शाई, कागद सज्ज लेखणी
माझ्यावर मी काय लिहावे?
माझी ओळख ,मलाच नसता
चित्र कसे मी रेखाटावे?
आत्मचरित्री पानोपानी
कृतज्ञतेचा वावर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

ऋणी तसा तुमचा पण आहे
गझला, कविता अन् शब्दांनो
खूप लाभल्या मित्र-मैत्रिणी
दूर पळा तुम्ही अब्दांनो
मुक्त कराने नशीब देता
अता कशाची मरमर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

किती घेतले, किती राहिले
श्वास कशाला हिशोब करता?
किती भेटले किती जोडले
मुजून घ्यावे जगता जगता
आठवणींना दरवळण्याचा
वाढदिवस हा अवसर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

वठलेल्या वृक्षास अचानक
कशी पालवी फुटू लागली?
कोरडवाहू शेत असोनी
ओलाव्याची भूक भागली
संतुष्टीच्या सायंकाळी
पाठीशी लंबोदर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Tuesday, October 8, 2013

इच्छापूर्ती


जुने ऐकुनी गोड तराने
आठवात रमली
कळले नाही कधी कशी ती
पावसात भिजली

श्रावणधारा कोसळताना
आस मनी रुजली
हळूच येइल मिठीत घेण्या
म्हणून ती सजली

भेटीमध्ये गुणगुणण्याचे
प्रेमगीत ठरवते
समोर येता सखा, गोंधळुन
भान तिचे हरवते

इश्श्य !, लाजणे बघून, त्याचा
एक चुके ठोका
कटाक्ष तिरपा तिचा, सख्याच्या
काळजास धोका

समोर येता साजन, होते
इच्छापूर्ती खरी
चिंब भिजविती मनास तिचिया
रोमांचांच्या सरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---  nishides1944@yahoo.com