Saturday, August 25, 2012

स्वातंत्र्याची पहाट ( स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने )


जोखड सुटले मानेवरचे
नवीन आला काळ असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वातंत्र्याचे पाईक आम्ही
खूप झगडलो फिरंग्यासवे
संग्रामी स्वतःस झोकले
रक्त सांडले तिरंग्यासवे
खडतर सेवा फळास आली
चोहिकडे आनंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वतंत्र क्षितिजा आज पहाण्या
पक्षी उडती स्वैर नभी
स्वप्न पाहिले सदैव जिचे
स्वातंत्र्य देवता मूर्त उभी
गर्वे फुलल्या सागर लहरी
भारतवर्ष बुलंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

द्विशतकाची काळी रजनी
लोप पावली, तेज पसरले
ध्वज तिरंगा उंच पाहुनी
आयुष्याचे दु:ख विसरले
गुलाम असता, मनात अमुच्या
धगधगता आक्रंद असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वातंत्र्याची मशाल देतो
तरुणांनो ती उंच धरा
सुख्दु:खाच्या वेळी अमुच्या
बलिदानाचे स्मरण करा
वरून पाहिन, राष्ट्रभक्तीने
जगता होउन धुंद कसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment