Saturday, August 25, 2012

करार केला


पुसून सारे प्राक्तनातले आज मनी मी
वसंतासवे जुळावयाचा विचार केला
पुन्हा नव्याने ललकारुन तुज, दुर्भाग्या रे!
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

गवताचे मी पाते बनलो थरथरणारे
दवबिंदूंचे दान लाभले चमचमणारे
प्रभात किरणे मिठीत घेउन वार्‍यासंगे

आनंदाने जगावयाचा प्रचार केला
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

फुले वेचतो, सुवास घेतो, हिरवळ बघतो
नभात उडतो, गाली हसतो, खुशीत जगतो
जुनेच जीवन स्वर्ग जाहले, कशामुळे तर
विचारसरणीमधे जरासा सुधार केला
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

जीवन म्हणजे सुखदु:खाचे असते मिश्रण
पण या जन्मी फक्त हवे मज आनंदी क्षण
दु:ख भोगतो पुढील जन्मी, देवालाही
पटवुन सौदा दु:खाचा मी उधार केला
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

होवुन दु:खी रडणे अथवा खुशीत हसणे
सर्व मनाचे खेळ आपुल्या जीवन जगणे
आनंदाने दु:खालाही गोंजारत मी
मधुमासाच्या शांत सागरी विहार केला
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

पूर्ण जाहले जगून जीवन, मागे बघता
सार्थकतेचा भाव दाटतो उरात नुसता
सफळ जाहली यात्रा आता ऐलतिराची
पैलतिराला निघावयाचा विचार केला
माझ्याशी मी हसावयाचा करार केला

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment