Saturday, August 25, 2012

मोठे होउन उगाच फसलो

श्रीमंतांची पंगत होती
जेवायाला उगाच बसलो
संसर्गाचा रोग जाहला
मोठे होउन उगाच फसलो

पक्वांन्नाचे ताट अताशा
घरी लागते जेवायाला
पिठले, भाकर, कांदा, चटणी.
अता लागलो विसरायाला
सायंकाळी हॉटेलातले
बेचव जेउन अपार थकलो
संसर्गाचा रोग जाहला
मोठे होउन उगाच फसलो

निर्विकार अन् नकली इथले
चलते फिरते पुतळे सारे
क्रत्रिमतेचे फक्त वाहते
घराघरातुन येथे वारे
हसू न आले मला कधीही
हसावयाचे म्हणून हसलो
संसर्गाचा रोग जाहला
मोठे होउन उगाच फसलो

नवीन फॅशन, स्त्री पुरुषांनी
करार करुनी संगत करणे
गोफ गुंफणे, रेशिम गाठी
जुनाट वाटे नाती विणणे
शिवण एवढी तकलादू की
माझ्या पासून मीच उसवलो
संसर्गाचा रोग जाहला
मोठे होउन उगाच फसलो

देव येथला अमीर आहे
पदोपदी हे मज जाणवते
गणेशासही विसर्जनाला
मर्सिडीज गाडीच लागते
ढोल, नगारे, गुलाल उधळण
आठवुन सारे मी गहिवरलो
संसर्गाचा रोग जाहला
मोठे होउन उगाच फसलो

निशिकांत देशपांडे मो. के. ९८९०७ ९९०२३
E Mail --nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment