Saturday, August 25, 2012

श्रावण अंगी झेलत आहे

गोड शिरशिरी रोमांचित मी
श्रावण अंगी झेलत आहे
आठवणींशी आज सख्याच्या
मनमुराद मी खेळत आहे

रात्र संपता संपत नाही
विरहाला मी पेलत आहे
मालवावया दीप ये सख्या
रात्र विरानी तेवत आहे

अधीर तन अन् अधीर मनही
तुझीच चाहुल ऐकत आहे
नको नकोचा नकोच पडदा
दूर सारुनी ठेवत आहे

भार एवढा तारुण्याचा
सांभाळुन मी चालत आहे
येउन घे तू मिठीत मजला
तुझीच सारी दौलत आहे

कधीच नव्हते कवयित्री पण
आज वही मी शोधत आहे
तरल भाव कवितेत गुंफण्या
शब्द फुले मी वेचत आहे


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment