Saturday, July 4, 2015

वाटते संजीवनी


दाह विरहाचा जसा जोपासला आहे मनी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

नागमोडी वाट दुर्गम एकटा मी चालतो
संगती नसता सखी, माझ्यासवे मी बोलतो
हा चिरंतन काच माझा, मी मिरवतो  कोंदणी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

एक जाता दु:ख दुसरे भोगतो नानापरी
पण तरी हसतोय सखये! फक्त या आशेवरी
कोळशातुन  वाट जाते , शोधण्याला हिरकणी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

सत्त्य हे ध्यानात आले चाळताना डायरी
तू नसायाचेच होते दु:ख हर पानावरी
अन्य दु:खांची कुठे आता करू मी नोंदणी?
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

भोवती आवाज सखये! पैंजणांचा ऐकला
अन् कवडसा एक अंधारी दिसाया लागला
स्वागताला मीच करतो तोरणांची बांधणी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

प्राक्तनी आहे तसे जगण्यात असतो अर्थ का?
वागणे सोडून चौकट, वाटते तुज व्यर्थ का?
हस्तरेषांची करू या चल नव्याने मांडणी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी

एकमेकाविन अधूरे केवढे! दोघे तरी
का असा आहे दुरावा? प्रश्न सलतो अंतरी
मी तुझे आकाश अन् हो तूच माझी चांदणी
जीवनाला वेदनाही वाटते संजीवनी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment