Monday, July 20, 2015

सोहळे आम्ही बघावे


पाखरांनी ऊंच आकाशी उडावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

विश्व क्षितिजापारचे त्यांचे असूदे
गाठण्या ते, या क्षणी त्यांना निघूदे
ध्येयमार्गी प्रेम अडसर ना बनावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

सुरकुत्यांच्या आड दु:खे झाकलेली
आसवेही खोल हृदयी गोठलेली
चेहर्‍यावर हास्य लटके गोंदवावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

झाड पानांचे, फुलांचे कंच हिरवे
जाहले निष्पर्ण, वठले वयपरत्वे
एकट्याने ऊन वार्‍याशी लढावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

नाळ तुम्हीही कधीची तोडलेली
आठवा कळ पालकांनी सोसलेली
दैव देते भूतकाळातिल पुरावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

नामस्मरणी वेळ आली गुंतण्याची
जोडलेले पाश सारे तोडण्याची
अन्यथा छळतील पिल्लांचे दुरावे
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे

संपण्याची आर्त स्वप्ने पाहताना
अन् मुलांशी रोज स्वप्नी बोलताना
मस्त जगलो, अंत समयी का रडावे?
कौतुकाने सोहळे आम्ही बघावे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment