Saturday, July 11, 2015

कंच हिरवी तोरणे

कंच हिरवी तोरणे (आजच तयार झालेली कविता----स्पर्धेत माझा विनम्र सहभाग)

पुत्र झाला! संपल्याने प्राक्तनाचे घोरणे
बांधली होती घराला कंच हिरवी तोरणे

साकडे  देवास होते त्या घराने घातले
पाच कन्यांनाच पोटी आमुच्या का धाडले?
न्याय करण्याची तर्‍हा अन् काय देवा धोरणे?
बांधली होती घराला कंच हिरवी तोरणे

लाभता वंशास दीपक ठेंगणे आकाशही
वळचणीला सर्व ज्योती ना खबर कोणासही
आदिमाया, आदिशक्ती बेगडांची वेष्टने
बांधली होती घराला कंच हिरवी तोरणे

फेडण्या नवसास गेले माय यल्लम्मा जिथे
पाच गेल्या चार आल्या, पाचवी चरणी तिथे
हाव पोराची कुणाला, दु:ख कोणा भोगणे?
बांधली होती घराला कंच हिरवी तोरणे

माय मोठ्याला कडेवर, पोर छोटी चालते
रांधते मुलगी घरी आम्हा न कांही वाटते
का असे बधिरत्व आले? सांग ना संवेदने!
बांधली होती घराला कंच हिरवी तोरणे

आजची स्त्री सज्ज आहे चौकटी तोडावया
लांब पल्ल्याची लढाई, संकटे झेलावया
दाखवुन देइल जगाला, जाणते हिसकावणे

निशिकां देशपांडे

No comments:

Post a Comment