Wednesday, July 8, 2015

देईन मी प्रतिसाद सखये


डाव खेळू जीवनी नाबाद सखये
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

आवसेला पौर्णिमा सजवीत जाऊ
पाहिजे ते भाग्यही घडवीत जाऊ
का धरावा कुंडलीचा नाद सखये?
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

मान्य! खडतर मार्ग आहे जीवनाचा
पाकळ्यांचा तर कधी काट्याकुट्यांचा
चालताना अनुभवू उन्माद सखये
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

हात तू आश्वस्त दे हातात चढण्या
ऊंच ध्येयांच्या सखे प्रेमात पडण्या
तारकांशी ये करू संवाद सखये
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

व्यक्त होण्याची तर्‍हा आपापली पण
काय हृदयी? पुस्तके ना छापली पण
भावनांचा मी तुझ्या अनुवाद सखये
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

तू जिथे जाशी तिथे श्रावण बरसतो
एकटा भेगाळलेला मी भटकतो
मी कधी केली कुठे फिर्याद सखये?
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये

नेहमी हे चालते, तू फुंकरावे
अन् मनी हुरळून मीही अंकुरावे
जाहलेला मी जरी बरबाद सखये
साद दे, देईन मी प्रतिसाद सखये


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment