अंगणी बरसात होता
मी मनी भिजते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
काय घडते आठवांने
मी सख्या सांगू कसे?
सांगते ज्यांना, तयांना
वाटते जडले पिसे
प्रश्न सार्यांना, खुशीने
एकटी जगते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
भेटता स्वप्नातही पण
एवढी गंधाळते!
चेहर्यावरची उदासी
तत्क्षणी तेजाळते
फेशियल, लिपस्टिकविना मी
आरशा! सजते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
मी चिरंजिव आठवांच्या
संगतीने राहते
एकटी आहे जराही
मी कधी ना मानते
ऊन नाही पण सख्याची
सावली मिळते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
मी गिधाडांना कधीही
भीक नाही घातली
जीवनाची वाट अवघड
एकट्याने चालली
भोवती काटे कळीच्या
पाकळी फुलते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
छेडला मल्हार जेंव्हा
मुक्त ओघळल्या सरी
लाउनी शुन्यात दृष्टी
आर्तले मी अंतरी
ताल, सम ना गावताही
सूर मी धरते कशी?
साजनाच्या चाहुलीने
अंतरी खुलते कशी?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment