बेसावध मी असताना
स्वप्नांना रुजवुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
श्रावण त्याच्यासंगे का
तो श्रावण बनून येतो?
मी मेघाला हे पुसता
तो हसतो निघून जातो
ग्रिष्मात एकदा आला
अन् धो धो बरसुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
मी दार किलकिले केले
त्याच्यासाठीच मनाचे
मज वेड लागले होते
सखयाच्या आगमनाचे
तो झोका प्राजक्ताचा
आला गंधाळुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
मी चकोरकुळची कन्या
तो चंद्र, नभीचा स्वामी
दोघात कसे हे फुलले
विरहाचे नाते नामी
भेटीची, मावळताना
तो आस जागवुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
या जुनाट भिंती, विटका
आयुष्याचा डोलारा
वाटते निघोनी जावे
यावे न इथे दोबारा
एकाच कटाक्षाने तो
रंगांना उधळुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
मी व्यर्थ दु:ख का करते?
तो दूरदूर असल्याचे
अन् शल्य मनी जाणवते
जे हवे तेच नसल्याचे
अंतरी पाहता कळले
तो मजला व्यापुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment