Monday, November 18, 2013

का ओहोटी दिसली नाही?

असून आवस आयुष्याची
भरती का ओसरली नाही?
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पापणीत तुज साठवले पण
तरी ती सदा ओली असते
आठवणींशी कुजबुज करता
हळूहळू गाली ओघळते
स्पंदनातही हवीहवीशी
ऊब तुझी जाणवली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पक्षी येती, जाती पण या,
आठवणी येतात फक्त का?
आठवणींची वर्दळ असुनी
मना वाटते रिक्तरिक्त का?
एक जमाना झाला माझ्या
कळी मनाची फुलली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

दिवस, रात्र मी ढकलत असतो
काळ असा हा कसा थांबला ?
तुझी वजावट झाल्यापासुन
प्रवासातला वेग खुंटला
तुझ्यात गाडी अशी अडकली !
पुन्हा कधी चौखुरली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

आनंदाने जगता जगता
आठवणींचे बीज पेरतो
माणसास या सुखी क्षणांचा
भविष्यात मग पाश काचतो
क्षणाक्षणाला गुदमर येथे
वाट मोकळी उरली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

आयुष्याच्या डायरीत या
कसे रकाने भरावयाचे?
घडण्याआधी लिहिण्याजोगे
वेध लागले सरावयाचे
पूर्ण फाटकी झोळी माझी
मिळून सारे, उरले नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment