Monday, November 18, 2013

एकएकटी नांदत होती

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळ्सांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



No comments:

Post a Comment