Tuesday, December 3, 2013

का आवडते बदाम राणी?


तरुण तेजपाल याचे गोव्यातील यौवनशोषणाचे प्रकरण बरेच गाजले. टीव्ही वर पण २४x७ हे दाखवले जात होते. एका दृष्यात तर तरुण आणि त्याच्या पत्नीला कार मधे बसताना दाखवले. सहाजीकच त्या बिचारीचा चेहरा पडला होता. तरुण आणि पिडित मुलगी यांच्या वयातील अंतर बघता खूप घृणा आली. उद्वेगातून खालील कविता जन्माला आली आहे. अशा रचनेत नेहमीचा कवितेचा पोत थोडा बदलतोच. वाचकांनी हे ध्यानात ठेवून ही रचना वाचावी.

फ्यूजन होता परक्या स्त्रीशी
भावतात का ओंगळ गाणी?
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

संकटातही देत साथ ती
प्रपंचामधे राबराबते
प्रेम एवढे ! वटपूजेला
सातजन्म ती साथ मागते
घरकी मुर्गी दाल बराबर
म्हणून का तिजशी बेमानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

नका विचारू कोणाच्या तो
वळणावरती चालत आहे?
शोध सावजांचा घेण्याची
जुनी पुरानी आदत आहे
फुले हुंगणे, वडिलोपार्जित
गूण उतरलाय खानदानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

मुलगी किंवा नात वयाने
मनी नांदतो चंचल पारा
विकृतीच ही ! कुठे मिळावा?
सावजास या जगी सहारा
धोका टाळुन जगावयाची
ससेहोलपट केविलवाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

आरक्षित हे  क्षेत्र नसावे
पुरषांसाठी असे वाटते
स्त्रीही आता मागे नाही
चित्र भयावह उरी दाटते
मादक राणी, गुलाम दिसता
शिंपित असते गुलाबपाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment