सदैव आधी विव्हळत होतो
दु:ख, उसासे आठवल्याने
कारण नसतानाही हसणे
मस्त शिकवले हास्यक्लबाने
जिची नेहमी वाट बघावी
अशीच असते सकाळ अमुची
हास्यासोबत प्राणायाम अन्
सवय लागली व्यायामाची
लुप्त जाहल्या अनेक व्याधी
हसण्याने अन् हासवण्याने
कारण नसतानाही हसणे
मस्त शिकवले हास्यक्लबाने
मनोवेदना व्यक्त कराया
किती आपुले सभोवताली!
सारे माझे, मी सार्यांचा
हीच वाटते खरी खुशाली
रेशिम गाठीतली कैद ही
रंग खुलवते सातत्याने
कारण नसतानाही हसणे
मस्त शिकवले हास्यक्लबाने
हास्यपंचमीचा हा उत्सव
बारा महिने करू साजरा
आयुष्याचा अंतिम क्षणही
जरी बोचरा, करू गोजिरा
सांज सकाळी हसू एवढे!
पळून जावे नैराश्याने
कारण नसतानाही हसणे
मस्त शिकवले हास्यक्लबाने
सुमन सोबती विठ्ठल असता
वातावरणी सदैव दरवळ
या वयातही अमाप दिसते
अंतःकरणी त्यांच्या हिरवळ
पावन झालो सदस्य आम्ही
केवळ त्यांच्या गुरुमंत्राने
कारण नसतानाही हसणे
मस्त शिकवले हास्यक्लबाने
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment