Tuesday, October 23, 2018

जिंदगी ओंगळ आहे



गर्भामध्ये अंकुरले त्या क्षणापासुनी
उपेक्षिताचे जीवन जगते, मंगळ आहे
जळमटलेल्या, कुंद कुंदशा कोपर्‍यातल्या
स्वच्छतागृहाहून जिंदगी ओंगळ आहे

कमीच घेती खबर मुलींची, कोपर्‍यात मी
नजर नेहमी भावावरती घरातल्यांची
मोठा असुनी दादा आईच्या खांद्यावर
दप्तर त्याचे सावरीत मी चालायाची
सारे रमती बालपणीच्या आठवात पण
वळून मी बघताना दिसते भळभळ आहे
स्वच्छतागृहाहून जिंदगी ओंगळ आहे

ज्यांनी ज्यांनी कैक मनसुबे केले होते
जन्मायाच्या अधीच मजला मारायाचे
मला पदर येताच जाहल्या मधाळ नजरा
बाण विषारी मुकाट आता सोसायाचे
स्वच्छ हवा अन् खुले नभांगण उडावयाला
पिढी दर पिढी नारीला का दुर्मिळ आहे?
स्वच्छतागृहाहून जिंदगी ओंगळ आहे

ओंगळवाण्या, बरबटलेल्या जगात नुसती
स्वच्छ स्वच्छतागृहे कशाला चर्चा व्हावी?
गेले असता अशाच एका स्वच्छतागृही
कॅमेर्‍यातुन टिपली गेली नको ती छबी
धमक्यांचा तो काळ आठवुन थरथरते मी
जरी जीवनाचा आलेला मावळ आहे
स्वच्छतागृहाहून जिंदगी ओंगळ आहे


स्वच्छतागृहे दूर राहिली, टिचभर जागा
द्याल मला का शोध घेउनी धरतीवरती?
जिथे नसावा कधी राबता वखवखल्यांचा
उभे राहुनी जगेन एका पायावरती
युगायुगांच्या अन्यायांची दाद मागण्या
माफक माझी हीच मागणी केवळ आहे
स्वच्छतागृहाहून जिंदगी ओंगळ आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment