आयुष्याची सांज भासते भकासलेली
पहाटेस का पूर्वा दिसते काजळलेली?
सुरकुत्यांसही यक्ष प्रश्न हा मावळतीला
खरेच का अंधार सोबती इथून पुढती?
झगमगणारे जीवन ज्याचे जगून झाले
त्यास हवीशी मिणमिणणारी आता पणती
कालपरत्वे सर्व बदलले, आणि तुतारी
मुकी जाहली उन्मादाने वाजवलेली
पहाटेस का पूर्वा दिसते काजळलेली?
आयुष्याच्या या वळणावर यत्न करोनी
आठववणींच्या खोल सागरी डुंबायाचे
क्रूर असूदे वर्तमान पण, जगता जगता
गतकालाचे तरंग पाहत हरवायाचे
भयाण शांती आज असूदे, विसरलात का?
जुनी कालची जीवनशैली वादळलेली
पहाटेस का पूर्वा दिसते काजळलेली?
खरे आहे की आयुष्याची मैफिल आता
अंतिम वळणाकडे चालली गात भैरवी
वेदनेसही हसावयाला शिकवायाचे
सूर लाउनी गात मखमली गीत शैशवी
संकटरूपी परवान्यांनी विझवलीच तर
शमा नेहमीसाठी नसते मालवलेली
पहाटेस का पूर्वा दिसते काजळलेली?
डोळे मिटुनी शांत शांत मी विचार करतो
सभोवताली कुणी नसूदे, दु:ख कशाला?
सारे माझे, मी सार्यांचा, निळे चांदणे
हिरवळ, दरवळ, वसंतही माझ्याच उशाला
जुने वस्त्र त्यागून जन्म मी नवा घेउनी
अधीर बघण्या जुनी कुडी ही पालवलेली
पहाटेस का पूर्वा दिसते काजळलेली?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment