Wednesday, September 26, 2018

हास्य पताका खांद्यावरती

निसर्ग हिरवा, कुशीत शिरण्या
विसरुन सारी नाती गोती
उत्साहाने सर्व निघाले
हास्य पताका खांद्यावरती

युगा मागुनी युगे संपली
तरी हिमालय एकएकटा
निर्विकार, ना त्याला भाऊ
त्याहुन मोठा आणि धाकटा
सारे आपण शिकऊ त्याला
हसावयाच्या रीती भाती
उत्साहाने सर्व निघाले
हास्य पताका खांद्यावरती

धर्म संस्कृती विभिन्न जपती
वेगवेगळ्या विभिन्न भाषा
पण सर्वांच्या मनी नांदते
मुक्तपणे हसण्याची आशा
रोज रोज हसण्याने तुमच्या
तोंडावरती फुलेल कांती
उत्साहाने सर्व निघाले
हास्य पताका खांद्यावरती

सुरकुत्यातही चेहर्‍यावरच्या
हास्य पेरले, परिवाराने
आनंदाच्या कुंभावरती
हक्क सांगतो आधिकाराने
वाढदिसाला किती आपुले!
केक कापण्या हातावरती
उत्साहाने सर्व निघाले
हास्य पताका खांद्यावरती

ब्रीद घेतले हसायचे अन्
हसवायाचे सर्व जगाला
हो हो हा हा महामंत्र हा
दिक्षा देऊ आम जनाला
नकोय औषध, नकोत गोळ्या
रुजवायाची हीच संस्कृती
उत्साहाने सर्व निघाले
हास्य पताका खांद्यावरती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



No comments:

Post a Comment