Thursday, June 18, 2015

देउनी गेली उसासा


अंतरी खचल्या मनाला
पाहिजे होता दिलासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

तू सखे येणार कळता
हासल्या भिंती कुडाच्या(*)
ग्रिष्म सरला, चिंबले मन
चाहुलीने श्रावणाच्या
नाव माझ्या झोपडीला
मी दिले होते लव्हासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

वाट बघणे प्रेयसीची
छंद हा जन्मांतरीचा
जो कधी सुखवी मना तर
काच ठरतो अंतरीचा
मृगजळापासून मिळतो
का तृषार्ताला दिलासा?
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

पूर्ण मी हरवून गेलो
माझिया पासून जेंव्हा
आरसा छद्मीपणाने
हासला पाहून तेंव्हा
हे असे का जाहले? मी
कोणता देऊ खुलासा?
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

पाकळ्यांशी गूज माझे
तू सखे ऐकू नको ना!
गंध घेतो द्यावया तुज
संशयी होऊ नको ना!
गंधकोषी भेटशिल तू
हा मनी आहे भरवसा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

आठवांच्या संगतीने
दु:ख बोथटले जरासे
वाळवंटी नांदताना
वाटते निवडुंग खासे
जो दिवस उगवे सकाळी
वाटतो आहे बरासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment