Friday, June 5, 2015

लाट तू झालीस का?



हे खरे! मी जा म्हणालो
पण अशी गेलीस का?
नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?

लूट जर झाली फुलांची
गंधही जातो सवे
तू सखे गेलीस सोडुन
आठवांचे का थवे?
ठाण मांडुन खोल हृदयी
तू अशी बसलीस का?
नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?

तुज म्हणे कविता नि गझला
आवडाया लागल्या!
शब्द माझे पण तुझ्याही
चित्तवृत्ती चिंबल्या
कंच हिरव्या श्रावणाला
पाठ दाखवलीस का?
नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?

तू मनाच्या संथ डोही
टाकले इतके खडे!
त्या तरंगातील गुदमर
ऊर माझा धडधडे
पाडण्या हृदया चरे तू
ठरवुनी आलीस का?
नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?

श्रावणाची आस नाही
ग्रिष्म माझा सोबती
सांग! विरहाहून मोठी
होरपळ ती कोणती?
पोळणे गुणधर्म असुनी
चांदणे बनलीस का?
नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?

संपले युग सोनियाचे
सांज आली जीवनी
एकटी असतेस आता
साजनाविन साजनी
शर्यतीमध्ये यशाच्या
तू अशी हरलीस का?
 नाव बुडवायास माझी
लाट तू झालीस का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment