Tuesday, December 18, 2012

कैदेत बंद आहे


आरंभ या जगाचा
मी निर्विवाद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

आहोत अप्सरा पण
अस्तित्व काय आमचे?
देवास रिझविण्याला
का रोज नाचायचे?
नारीस शोषण्याचा
आय्याश छंद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

वस्तीत लुटारूंच्या
हसणे जरा उमलणे
उपयोग संपल्यावर
कोमेजणे नि सुकणे
निर्माल्य वळचणीला
सरला सुगंध आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

मेल्यासमान जगणे
जगता हजार मरणे
पर्याय हेच आम्हा
तगमग उरात जपणे
गुदमर कुणा न दिसतो
हे विश्व अंध आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे

चुरगळ कळ्या फुलांचा
लिलया करून जाती
निर्लज्जपणे दिवसा
फिरतात उजळमाथी
का आमुचाच देवा
अंधार गर्द आहे?
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे

मागून का जगी या
मिळते कुणास कांही?
लढण्या शिवाय आता
दुसरा उपाय नाही
हातात खड्ग धरले
मनिषा बुलंद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment