एकदा हो किंवा नाही सांगून टाक
ती तुझ्यासाठी कुढते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
ती नाजूक वेल थरथरणारी
जगायला अधाराची गरज आहे
आधार म्हणून कोण हवाय
याची तिला समज आहे
निराश होउन आकांक्षांच्या पर्णफुटीला
स्वतःच ती खुडते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
नाद होता तिला बांधायचा
हवेत इमले, पत्त्याचे बंगले
समुद्रकिनारी तुझ्या सोबतीने
उभारले किती वाळूचे किल्ले?
वास्तवाची जाण आणी जमिनीवर पाय टेकता
इमले, पत्त्याचे बंगले निर्विकारपणे तोडते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
प्रेमपत्रं खूप लिहिली होती पण
लाजरीनं पोस्टच केली नाहीत
अनिश्चितेच्या वेदनांचे डंख
तिचे तिलाच असतील माहीत
मुळात ती निनावी पत्रं नव्हती पण हार मानून
पत्रातले स्वतःचे नाव ती खोडते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
धोधो बरसणारा मल्हार कधी
तर कधी मनभावन बसंत
तिन्ही त्रिकाळी आळवत असे
नव्हती तिला उसंत
आता मिरेचे विरहगीन अन् विषाचा प्याला घेउन
अस्तित्वाची लढाई लढते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
आहेस खरे तर तू सूर्य तिचा
पण तिला अंधार का देत आहेस?
उजेड तुझा संपून गेलाय, की
तिची सत्व परिक्षा घेत आहेस?
कवडसा होउन गेलास तर दिसेल तुला
तुझाच अंधार पांघरून ती रडते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment