Tuesday, September 18, 2012

हीच माझी वाट होती

तीच वस्ती, ती गुरे अन् तेच मंदिर
पण दुतर्फा काल झाडी दाट होती
बालपण फुलले जिथे ती, आठवांनी
लगडलेली हीच माझी वाट होती

सोडुनी आयुष्य ते खेड्यातले मी
आज का शहरात आलो? चूक झाली
हातसडीचा भात, घरचे तूप गेले
बर्गर, पिझा, थाळीच आता भूक झाली
नांदणे एकत्र मायेने, सुखाने
स्नेहबंधाचीच विरली लाट होती
बालपण फुलले जिथे ती, आठवांनी
लगडलेली हीच माझी वाट होती

दूर मथुरा पण तरी गावात माझ्या
प्रतिवर्ष जन्मे यादवांचा सावळा
किर्तनी, भजनात सारे दंग होती
जन्माष्टमीचा खास होता सोहळा
सूंठसाखर वाटण्याची मंदिराने
कैक वर्षे पाळली वहिवाट होती
बालपण फुलले जिथे ती, आठवांनी
लगडलेली हीच माझी वाट होती

अंगणी झाडे फुलांची, कैक वेली,
मोकळी झुळझुळ हवा, पक्षी थव्याने,
दावणीला बांधलेली गाय कपिला
जीव गुदमरतो किती त्या आठवाने !
टोचते मज फोम गादी, मी भुईवर
आर्ततेने टेकली हो पाठ होती
बालपण फुलले जिथे ती, आठवांनी
लगडलेली हीच माझी वाट होती

पाहण्या जाऊन मी पडक्या घराला
वेळ, पैसा का करावा खर्च आता
अंगणाचे घर कसे असते बघाया
संगणक उघडून करतो सर्च आता
बेडरुम नव्हते घराला, ओसरीवर
घोंगडे टाकून दिसली खाट होती
बालपण फुलले जिथे ती, आठवांनी
लगडलेली हीच माझी वाट होती


निशिकांत देशपांडे  मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com




No comments:

Post a Comment