Sunday, September 23, 2012

पुन्हा गणपती नाचत आले

दूर जाहले आकाशीचे
मळभ, जीवनी उजेड झाला
भक्तजनांना दर्शन देण्या
पुन्हा गणपती नाचत आला

तू आल्यावर, जाण्याआधी
सुवर्ण असतो काळ आमुचा
भक्तिरसाची झिंग अशी की
हरवुन जातो ताळ आमुचा
तूच दयाळू अन् कनवाळू
तुझी सावली सकळ जगाला
भक्तजनांना दर्शन देण्या
पुन्हा गणपती नाचत आला

उच्च रवातिल फिल्मी गांणी
चोविस घंटे कसे ऐकशी?
कमाल आहे तुझी गणेशा
संयम आम्हा किती दावसी?
वेळ आली रे कान पिळूनी
समजावावे स्पष्ट जगाला
भक्तजनांना दर्शन देण्या
पुन्हा गणपती नाचत आला

वाचतोस का नाही श्री तू?
पाढा अमुच्या दुष्कृत्त्यांचा
देवा समोर स्वर्गी जाउन
विजय येथला दुष्कृत्त्यांचा
तिसरा डोळा सांग उघडण्या
जरा तुझ्या क्रोधी बाबाला
भक्तजनांना दर्शन देण्या
पुन्हा गणपती नाचत आला

पुण्य जाहले लज्जित येथे
पाप वावरे उजळपणाने
धर्म पराजित होउन त्याचे
स्खलन होतसे कणाकणाने
जन्म घ्यायची वेळ आली हे
स्मरण जरा दे श्रीकृष्णाला
भक्तजनांना दर्शन देण्या
पुन्हा गणपती नाचत आला


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com


No comments:

Post a Comment