Monday, September 17, 2012

अश्रूंनाही नको नकोसे

कधी न रडतो, जगास वाटे
आहे मी खुशहाल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल

म्हणे कधी मी मोठा होतो
समाजतही मान
बरे जाहले विसरुन गेलो
इतिहासाचे पान
नवीन लिहिण्या कोरी पाटी
पुसला सारा काल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल

चालत आहे काळासंगे
थकल्यावर थांबतो
पुढे जमाना जातो, मागे
वळतो ना पाहतो
उरली माझी मलाच संगत
धरतो आता ताल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल

सुखदु:खाची तमा न करता
अलिप्त मी वागलो
जगलो, मेलो कैक जन्म अन्
चिरंजीव जाहलो
बघून माझा बुलंद लहजा
चुकचुकली ना पाल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल

कलंदरी अन् बेदरकारी
सूत्र नवे गवसले
मुक्त वागतो, नात्यामधले
पीळ सर्व उसवले
प्यादे बनलो कधीच नाही
सवती माझी चाल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल

काय कमवले? काय गमवले?
हिशोब केला काल
ग्रिष्म तापले, वसंत फुलले
अनुभवले हरसाल
हीच शिदोरी पदरी माझ्या
झालो मालामाल
अश्रूंनाही नको नकोसे
सुरकुतलेले गाल


निशिकांत देशपांडे  मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com


No comments:

Post a Comment