Saturday, February 12, 2022

अमरत्वाला श्रध्दांजली --(वीक एंड लिखाण)--13.02.22

माणसाचा मेंदू म्हणजे एक विचित्र रसायन आहे. विशेषतः आठवणींच्या बाबत. केंव्हा कोणत्या आठवणी का याव्यात हे एक कोडेच आहे. कधी कालचे आठवत नाही तर कधी बाल्यावस्थेतील घटना स्पष्ट आठवतात. परवा असेच झाले. रात्रीच्या  निरव शांततेत जुनी हिंदी गाणि ऐकत असता एक लता मंगेशकरने गायलेले १९५३ मधे बनलेल्या पतिता नावाच्या सिनेमातील एक गाणे लागले. त्या गाण्याचे बोल होते:

किसीने अपना   बनाके ,  मुझको मस्कुराना सिखा दिया 

अंधेरे घरमे किसीने हसके चिराग जैसे जला दिया

शैलेंद्रने किती सुंदर बोल लिहिले आहेत या गीताचे! तेच शंकर जयकिशन यांनी दिलेल्या संगिताबाबत म्हणता येईल. आणि गायले आहे सदाबहार गायिका लताजींनी

 माझी समाधीच लागली. आणि हे गाणे ऐकत असताना मी माझ्या आयुष्यात जवळ जवळ पन्नास वर्षे मागे गेलो. मला स्पष्ट आठवतय की ज्या दिवशी बंगला देशात १९७१ मधे बंगला मुक्ति बाहिनी आणि भरतीय सैन्यासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली त्याच दिवशी मी त्या काळी फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेयर विकत घेतला होता. या कंपनीचे हे एकमेव मॉडेल बाजारात होते. मग जसे आर्थिक दृष्ट्या जमेल तसे दर महिन्यात रेकॉर्ड्स घेणे सुरू झाले. आम्ही पहिली घेतलेली रेकॉर्ड पतिता सिनेमातली होती ज्यात वरचे गाणे होते. हे गाणे आम्ही दिवसातून पाच सहा वेळा तरी ऐकत असू. कधी बोअर झाले नाही. लताचा तलम आवाज, गाण्याची अवीट गोडी खूप खूप लुटली. हा रेकॉर्ड प्लेयर घेतल्यानंतर आमच्या घरात संगीत महोत्सवच सुरू झाला.

आज लतादीदी बद्दल लिहायची तिव्र इच्छा झाली. पण एवढ्या मोठया कलाकाराबद्दल म्या पामराने लिहावे ते काय! आणि गेल्या दोन तीन दिवसात बर्‍याच दिग्गजांनी पुष्कळ लिहिले पण आहे. असंख्य कविता पण लिहिल्या गेल्या आहेत. मी माझ्या वयक्तिक दृष्टीकोनातून आठवायचा  प्रयत्न करणार आहे. प्रचंड सूर्याला ओंजळभर पाण्याने अर्घ्य दिल्यागत.

लताजीने माझ्यासारख्या अनेकांचा , नव्हे तर पूर्ण देशाचा कान बनवला. त्यात लहान, मोठे, सुशिक्षीत, अडाणी सारेच आले. मी लहानपणी, अगदी गुराखी मुले पण जनावरे चारताना शेतात  मन डोले मेरा तन डोले हे गाणे म्हणताना/गाताना ऐकले आहे. अशी वदंता आहे की औरंगजेब हा संगिताचा द्वेष्टा होता. मला खात्री आहे की जर त्या काळी लताजी असत्या तर त्यांना ऐकून तो पण संगिताचा भोक्ता झाला असता. आजही रेडियो लावला तर पहिल्या दहा मिनिटातच लताजींचे गाणे लागले नाही असे होतच नाही. असंख्य मूड्स, असंख्य हरकती, असंख्य खास जागा, काय नाही त्यांच्या गाण्यात. आवड असेल तर आयुष्यभर पुरेल इतका मोठा खजिना आहे संगिताचा! 

बॉलिवुड क्षेत्रातल्या बजबजपुरीच्या अंगणातील पवित्र तुळस म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो त्यात नटी नूतन आणि लतादिदी आहेत. अर्थात हे माझे मत नाही तर साठ पासष्टच्या दरम्यान मी रसरंग नावाचे फिल्म मॅगझीन वाचत असे त्यात मी हे वाचलेले आहे. माझे स्वतःचे मत असे आहे की आमची पिढी खरेच भाग्यवान की आम्ही लताजी, सचिन तेंडूलकर, दिग्गज फिल्म संगितकार, गायक अशा मातब्बर मंडळीस पाहिले, ऐकले आणि जीवनाचे एका अर्थाने सोने झाले. अजून शंभर वर्षाने जर कुणी लताजी बद्दल सांगितले तर असे कोणी होऊन गेले हे खरे पण वाटणार नाही पुढच्या पिढ्यांना. त्यांना ही दंतकथा वाटेल.

मी आणि माझी पत्नी दोघेही दिवसभर टीव्हीला चिकटून बसलो होतो. दिवसभर लताजीच्या प्रेत यात्रेचे कव्हरेज बघत. प्रेतयात्रेत एक ग्रेस होता. आफाट गर्दी पण शांतपणे जमाव धीरगंभीरपणे पुढे सरकत होता. निरव शांतता. कुठेही फालतू घोषणाबाजी नव्हती. नेहमीच्या घोषणा जशा की जबतक सूरज चाँद रहेगा तबतक --------तेरा नाम रहेगा. मराठी चॅनल्सने कलाकारांच्या छान छान आठवणींना उजाळा देणार्‍या मुलाखाती घेतल्या ज्या लहान आणि समयोचित अशा होत्या. त्यात एक मुलाखात पद्मजा फेणानी यांची होती. थोडक्यात त्यांनी लताजींच्या हृद्य आठवणी सागून लताजीने गायलेले फिल्म हकीकत मधील एका गाण्याचा मुखडा गाऊन दाखवला. गीत होते"जरासी आहट होती है दिल सोचता है, कंही ये ओ  तो नही". अप्रतीम गाणे. हे ऐकताना मला अक्षरशः भरून आले. आवंढा कसा बसा गिळत पत्नी तर बघत नाही ना या शंकेने तिच्याकडे बघितले तर तिलाही भरून आलेले होते.

अजून एक किस्सा येथे अवर्जून सांगावासा वाटतो. एकदा उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबाच्या गायनाची मैफिल चालू होती. कार्यक्रम एका शाळेच्या पटांगणावर होता. भव्य पटांगण आणि त्याच्या बाजूला घरे. कार्यक्रम अगदी रंगात आला होता. ख्वाँ साहेब   गायनात तल्लीन झालेले होते. सर्व श्रोते पण मंत्रमुग्ध झालेले होते. खॉसाहेबांनी मधेच गाणे थांबवले आणि डोळे मिटून समाधी लागल्यागत बसले. तब्बल दोन मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले. श्रोत्यांना कळेना काय झाले ते. नंतर त्यांनीच खुलासा केला. शेजारच्या एका घरात रेडियोवर लताचे गाणे लागले होते. भाई भाई चित्रपटातील "कदर जाने ना मोरा बालम, बेदर्दी मोरा बालम." डोळे उघडून ते स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले जे माईकमुळे सर्वांना ऐकू आले. ते म्हणाले की "ये कंबख्त कभी बेसुरी होतीही नही" किती मोठी ही पावती होती एका दिग्गज कलाकाराकडून लताजींना!

अजून एक आश्चर्यजनक किस्सा सांगतो. एके दिवशी माझा मोबाईल वाजला. पलिकडून एका महिलेचा आवाज. त्यांनी सांगितले की आपले कांही काव्यसंग्रह असतील तर लताजींना हवे आहेत. मी त्यांच्या कार्यालयातून बोलते. त्यांच्या वाचनात कांही आपल्या कविता आल्या आहेत ज्या त्यांना आवडल्या आहेत. मी स्वतःला चिमटाच काढला. अघटित घटना होती ही! मी तरंगायलाच लागलो. मी दुसरेच दिवशी माझे गझल आणि काव्यसंग्रह पाठवून दिले. जवळ जवळ एक महिन्याने मला एक त्यांचे पत्र प्राप्त झाले ज्यात कांही रचनांची नावासकट नोंद घेऊन कविता आवडल्याचे लिहिले होते. माझे नशीब की मला हा ओझरता परीस स्पर्श झाला आणि मी धन्य झालो.

मी पटियाला येथे बँकेत कार्यरत असताना हिंदी कविता लिहीत असे. त्यावेळी लताजींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर एक कविता (हिंदी) रचली होती. या कवितेची पण त्यांनी नोंद घेतली होती.

जेंहा मोहंम्द रफीचा मृत्यू झाला तेंव्हा अमीन सायानीने एक खास कार्यक्रम पेश केला होता रेडियोवर. या कार्यक्रमाचे नावच होते "जमाने ने देखे जवाँ कैसे कैसे" किती चपखल नाव होते नाही! कित्येक विभूती काळाच्या पडद्याआड दडून गेल्या. हेच लताजींबद्दल पण म्हणता येईल.

कधी कधी एक अशक्य गोष्ट मनात येते. जर आपले आयुष्य  दुसर्‍या माणसाला स्वेच्छेने देता आले असते तर? माझे स्पष्ट मत आहे की लताजी अजरामरच झाल्या असत्या एकार्थाने. कोण नाही देणार आपले थोडेसे आयुष्य या हिरकणीला? मी तर सर्वच देऊन टाकले असते. लतादिदींना श्रध्दांजली एक प्रकारे अमरत्वाला श्रध्दांजली आहे.

वरती ज्या हिंदी कवितचा उल्लेख केला आहे ती खाली पेश करतोय. जड अंतःकरणाने अलविदा, शब्बाखैर.


सदा रहा है उसपर नाज़


सूर देवता कई सालसे

सजी है पहने जिसका साज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


लगे चाँदनी बरस रही है

जबजब तेरे स्वर निकले

सुनकर तेरी धुन कोयलको

तरन्नुम के है पर निकले

अश्वमेध मे स्वर नगरीके

हार गये सब अपने ताज़

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


मयुरपंख के मृदुल स्पर्ष सम

भाती है हर तेरी तान

जबभी तुमने गीत है गाये

बढी है उन गीतोंकी शान

दुखियारा एक पल दुख भूले

सुनकर तेरी मधुर आवाज़

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


मायूसी चलते लगती है

तेरी धुन सावनकी फुहार

गर्म रेतसा जीवन फिरभी

नग़मे लायें नयी बहार

स्वरसरिता मे डूब गया हूं

मझे न कलकी फिक़्र है आज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


किर्तितेज हिरोंसे बढकर

आसमानमें गया है फैल

जन्मदिनके शुभ अवसर पर

अर्पण तुझपर फूल और बेल

चंदा सूरज रहने तक तुम

करोगी सब के दिलपर राज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़



निशिकांत देशपांडे, पुणे.  

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment