Sunday, January 9, 2022

जीव तोडुनी धावधावलो

 

मनात होती वेडी आशा

तिला कदाचित खूप भावलो

मृगजळ पुढती, मागे मागे

जीव तोडुनी धावधावलो


अबोल्यातही कुजबुज कुजबुज

ऐकू येते उगाच कानी

गूज हरवलेल्या शब्दांची

सुरू जाहलेली मनमानी

काल संपला, आज विदारक

माझ्यामधुनी मीच हरवलो

मृगजळ पुढती, मागे मागे

जीव तोडुनी धावधावलो


जसे व्हायचे तसेच झाले

पडते घेउन वेळोवेळी

दारावरती टकटक आता

का करसी तू सांज सकाळी?

बंद करोनी दार मनाचे

कोषामध्ये पुन्हा परतलो

मृगजळ पुढती, मागे मागे

जीव तोडुनी धावधावलो


एकटाच मी माझ्यामध्ये

उदासीसवे रोज नांदतो

व्यक्त जरासे होण्यासाठी

आरशासवे कधी बोलतो

भीक दयेची ठोकरून मी

कलंदरासम सदा वागलो

मृगजळ पुढती, मागे मागे

जीव तोडुनी धावधावलो



निशिकांत देशपांडे, पुणे.


No comments:

Post a Comment