Friday, November 26, 2021

मूक आक्रंद--( वीक एंड लिखाण )

 कांही वर्षापूर्वी करम या संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामधे वक्त्यांना विषय होता एकत्र कुटुंब पध्दती की विभक्त कुटुंब पध्दती योग्य. विषय तसा जुनाच आहे. यात चार पाच वक्त्यांनी भाग घेतला होता. ही भाषणे पूर्वार्धात झाल्यानंतर उत्तरार्धत याच विषयावरील कविता पण सादर झाल्या. मी या कार्यक्रमात आमंत्रित वक्ता आणि कवी म्हणून माझा सहभाग नोंदवला होता.

बर्‍याचजणांनी विभक्त कुटुंबपध्दतीची तरफदारी करताना प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले. पहिला मुद्दा असा होता की वैयक्तिक गुणांना संयुक्त कुटुंबात पोषक वातावरण नसते. जीवन म्हणजे एक गुदमर असते. पावलोपावली इतर लोक काय म्हणतील, मुलांच्या वैयक्तिक विकासाकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मनाला मुरड घालत जगावे लागते. या सर्वात जीवनाचा आनंदच हरवून जातो.

या व्यासपिठावर मी एकटाच एकत्र कुटुंबपध्दतीचा पुरस्कार करत होतो. याला कारणही तसेच होते. मी एका जंबो एकत्र गरीब कुटुंबात जन्मलो आणि वाढलेला होतो. मी या बद्दल आधिकाराने बोलू शकतो. मला आठवते आमच्या घरी जेवायला बसले  तर जेवणार्‍यांची संख्या पस्तीस ते चाळीसच्या घरात असायची. खरे वाटणार नाही कदाचित कुणाला. आणि हा मुद्दा मी पुण्यात, जिथे विभक्त पधदती पोसलेली आहे,  तिथे मांडत होतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे की माझे वडील नोकरी वगैरे करत नसतानाही आम्हा भावंडाचे पालनपोषण झाले. एकत्र कुटुंबात कुणी उपाशी रहात नसत. एक महत्वाचे म्हणजे बाँडिंग खूप घट्ट असते हे निश्चित! अजून एक महत्वाचा मी मांडलेला मुद्दा असा की विभक्त कुटुंबातील मुले होत असलेल्या लाडामुळे खूप आत्मकेंद्रीत असतात. त्यांना आपले कांही  इतरांशी शेअर करणे हा प्रकार माहीतच नसतो. बहुतांश मुले चिडखोर असतात.त्यांना घरच्या आई बाबांचे लक्ष शंभर टक्के हवे असते.  इगोईस्टही असतात. एकत्र कुटुंबातील मुले जास्त सहनशील असतात. आयुष्यातील धक्के सहन करायची शक्ती त्यांच्यात जास्त असते. शेवटी मी म्हणालो की प्राणी पण कळपाने रहातात; तर माणसाला का अवघड वाटावे? 

हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. पण हा विषय कांही माझी पाठ सोडेना!

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा जीवनावर होणार्‍या परिणामांचा परामर्ष घेणे  गरजेचे आहे असे  वाटते. आपली आर्थिक परिस्थिती, वाढत्या गरजा,  वैयक्तीक महत्वाकांक्षा, विभक्त कुटुंबपध्दतीत नवरा बायको या दोघांनाही नोकरी करण्याची गरज या गोष्टी मध्यम वर्गीयांच्या जीवनावर खूप परिणाम करत आहेत. आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण व्हावे म्हणून एक मूल कुटुंबशैली आता बर्‍यापैकी स्थीर झाली आहे. हे सर्व होणे अपरिहार्य आहे. पण या बदलाचे अनेक पैलू आहेत.


वर्किंग कपल्सच्या मुलांवर याचा परिणाम नक्कीच होतो आहे. आईला इच्छ असूनही मुलांना वेळ देणे जमत नाही. पण मुलांच्या वाट्याला उपेक्षा येते हे कुणाच्या ध्यानात येत नाही. बाळाला पाळणा घरात ठेवणे, त्याला सांभाळण्यासाठी आया ठेवणे या सर्व बाबीत मुलांची हेळसांड तर होतेच होते. मी कल्पना केली की अशा एखाद्या मुलाला अशी व्यथा सांगावयाची असेल तर तो काय सांगेल? त्याच्या मनात खदखदणार्‍या भावना असतीलच. अशा मुलांचा आक्रंद या रचनेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा कोणाचीही टिका करण्याचा हेतू नाही. बघा प्रयत्न यशस्वी झाला आहे का ते!


थोपवावे मी कसे?


पेटलेल्या काहुराला

शांतवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


पाळणाघर विश्व माझे

माय करते नोकरी

ऊब मायेची न तेथे

दु:ख सलते अंतरी

गात अंगाई स्वतःला

झोपवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


खेळणी भरपूर आहे

खेळतो मी एकटा

ना मला ताई न दादा

मीच मोठा, धाकटा

काचणार्‍या वेदनांना

जोजवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


अक्षरे गिरवून घेण्या

माय ना बाबा घरी

शिक्षणाचे तीन तेरा

मी रित्या कलशापरी

चित्र भावी जीवनाचे

रंगवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


कोक देते, चिप्स देते

ती घरी आल्यावरी

वेळ फिरवायास नसतो

हातही पाठीवरी

तृप्ततेचे स्वप्न नेत्री

जागवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


जन्म पुढचा द्यायचा तर

दे मला गरिबा घरी

हक्क आईचा मिळावा

ऐक माझे श्रीहरी

दु:ख तुज सोडून इतरा

दाखवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 24, 2021

गीत तुझ्यावर सुचते

 

चाहुल येता तुझी अचानक

मन माझे मोहरते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


तुझ्या वावराने तर माझा

आसमंत भरलेला

आत माझिया बघता कळले

मी तेथे नसलेला

नशा वेगळी हरवण्यातली

झिंग केवढी असते!

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


आठवणींचा श्रावण असतो

माझा महिने बारा

सभोवताली सदैव वाहे

गंधित गंधित वारा

स्वप्नांच्या दुनियेतही तुझे

स्वप्न नेहमी पडते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


एकदुज्यासाठीच निर्मिली

दोघांनीही हिरवळ

सहजीवन एवढे उमलेले!

घमघमणारा दरवळ

जीवन अपुले एक सोहळा

पदोपदी जाणवते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


चल ठरवू! मी गीत तुझ्यावर

लिहितो लयीत एका

चाल बसवुनी शीक गायला

मस्त धरूनी ठेका

सहभागाने दोघांच्याही

मैफिल रंगत असते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Monday, November 15, 2021

वैचारिक धुमारे--( वीक एंड लिखाण )


आपल्या भोवतालचे विश्व कोणी निर्माण केले या बद्दल भिन्न भिन्न मत प्रवाह आहेत. हिंदू धर्मानुसार विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. ब्रह्म हा निर्माता, विष्णू काळजी घेणारे ( preserver) तर महेश हे विनाश करणारे ( destroyer) आहेत. बरे झाले महादेवाने अजून तिसरा डोळा उघडलेला नाही. या विश्व निर्मितीसाठी किती विचार करावा लागला असेल ना ब्रह्मदेवाला? माणूस, विविध प्राणी, जीव जंतू वनस्पती असे अनेक प्रकार. पंचमहाभुतांचे असणे सुध्दा एका मोठ्या नियोजनाचाच भाग आहे.
पण मला जास्त आश्चर्य वाटते ते मानव निर्मितीचे. कारण मानवाला लाभलेली विचार करण्याची शक्ती अफाट आहे. इतर प्राण्यांना नाहीच असे नाही. पण माणसाला हे सारे भरभरून मिळालेले आहे. हे चांगले की नाही हा प्रश्न वेगळा. प्राण्यांमधे ते एखाद्या प्रसंगी कसे वागतील याचा अंदाज बांधता येतो आणि तो बहुतांश बरोबर असतो. पण माणसाचे तसे नाही. त्याचे वर्तन वेगवेगळे असू शकते; नव्हे असतेच. आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे कोणी अर्धा ग्लास रिकामा किंवा भरलेला म्हणेल. साधे लग्नाचे उदाहरण घ्या. कुणाला सुखासाठी लग्न हवे असते, कुणाला घरात कामाला बाई हवी असते तर कुणाला येणारी सून वंशवृध्दीसाठी हवी असते तर घरात येणार्‍या मुलीला स्वप्नपूर्ती हवी असते. हे मी पारंपारीक विचार शैलीबद्दल बोलतोय. विचारशैली अधुनिक झाली तरी ही मतभिन्नता कायमच असणारय जरी संदर्भ बदलले तरीही.
आज खुद्द ब्रह्मदेवालाही कोडे पडले असेल की मी बनवलेला माणूस तो हाच का? तो म्हणत पण असेल की " हेच फल काय मम तपाला." अशा अगम्य माणसाचे (ज्यात मीही आलो) मला नेहमीच कुतुहल वाटत आलेले आहे, कुठे थोडे जरी विचित्र वागणे दिसले तर लगेच विचारांना चालना मिळते.
हे वैचारिक वादळ निर्माण व्हायला एक छोटेसे कारण मला पुरेसे झाले.मी पुण्यात एका जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळी फिरायला जात असे.  ट्रॅकच्या शेजारी कांही फ्लॅट्स होते. मला एकेदिवशी दिसले की एका फ्लॅटमधून एक स्त्री गॅलरीत येवून आपले धुतलेले कपडे झटकून दोरीवर वाळू घालत होती. ती आत गेली की थोड्याच वेळाने एक गृहस्थ आपले कपडे झटकून वाळू घालत असत. हे दृष्य मी रोजच छंद म्हणून बघायला लागलो. दोघेही नवरा बायको असावेत बहुधा. माझ्या मनात विचार घोळायला सुरू झाले. त्यांचे आपापसात जमत नसेल कदाचित. पण मजबूरीने एकत्र रहात असावेत. अर्थात ही माझीच कल्पना. हे खरे असेल तर त्यांचे जीवन कसे असू शकते? यावर विचार सुरू झाले आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता म्हण्जे कवि मनाला फुटलेले वैचारिक धुमारे.

एक एकटी नांदत होती

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळसांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

मजेत राहू खुशीखुशीने

 

चार पाउले ये तू पुढती

मीही येतो तुझ्या दिशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


गैरसमज का चुकाच होत्या?

कीस कशाला पाडायाचा?

उगाळून का तेच ते पुन्हा

प्रश्न किती तो ताणायाचा?

विलंब झाला तरी निघावे

समझोत्याच्या फक्त दिशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


आपण बोलू, उत्तर शोधू

का शिष्टाई तिर्‍हाइतांची?

हीत आपुले जपावयाला

हवी पायरी का कोर्टाची?

इच्छा तेथ मार्ग सापडे

निराश तू आहेस कशाने?

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


जरी सुशिक्षित आपण दोघे

अशिक्षिताहुनही का वेडे?

काय चांगले अपुल्यासाठी

कसे सुटेना साधे कोडे?

भान हरवले दोघांचेही

आत्मघातकी अहं नशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


सहजीवन ही खरेच अवघड

तारेवरची कसरत आहे

एकदुज्याला समजुन घ्यावे

कुरघोडीला जागा नसते

साधा सल्ला साध्या कविचा

ना सांगितला कुण्या ऋषीने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३




Monday, November 8, 2021

आठवण डोकावते

 भूतकाळाच्या धुक्यातुन

आठवण डोकावते

बालपण माझे तुझे, मज

दूर मागे खेचते


बाहुला अन् बाहुलीचा

खेळ आपण खेळला

आजही ध्यानात आहे

रंगलेला सोहळा


वाढदिवसाला दहाव्या

फूल देताना तुला

तू मला गोळ्या दिल्या अन्

हात हलके दाबला


प्रेम नक्की काय असते

माहिती नव्हते तरी

भेटल्या नजरेस नजरा

टाळुनी नानापरी


मार्ग झाले वेगळे अन्

रंगले मी सासरी

वाटते आठवून सारे

संपल्या श्रावणसरी


फेसबुकवर मी अचानक

आज तुजला पाहिले

तू कवी झालास हेही

मी लगेचच जाणले


वाचली कविता तुझी अन्

श्वासही रेंगाळला

शब्दरूपी मोगर्‍याने

देहही गंधाळला



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३