Monday, January 18, 2021

आनंदाश्रू झरती---वीरपत्नीचे मनोगत


" कामी आला ", सीमेवरुनी

निरोप आल्यावरती

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती


आठवते ती अंगावरची

हळद केवढी ओली !

आनंदाचे दिवस संपण्या

अधीच ऑर्डर आली

समजावत मज सखा म्हणाला

माझे बाहू स्फुरती

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती


युध्द जरी का चालू होते

फोन यायचा रात्री

निडर एवढा! असावयाची

मनी यशाची खात्री

किती मारले शत्रू याची

करावयाचा गिनती

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती


देशासाठी मरावयाची

सुवर्ण संधी असते

कौटुंबिक जाहली क्षती तर

रडावयाचे नसते

तेवत असते शहिदांसाठी 

विझू नये ती पणती

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती


सैनिक पत्नी हात जोडुनी

दान मागते आहे

शहिदांसाठी सन्मानावर

हक्क सांगते आहे

सडकेवरचे गुंड कशाला

भंपक नेते म्हणती?

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती


माझ्या गर्भामधे सख्याचा

अंकुर आहे रुजला

मातृभूमीला आर्घ्य द्यायला

वारस आहे ठरला

मरून अजरामर झाल्यावर

जगात होते महती

डोळ्यामधुनी दुखःसोबत

आनंदाश्रू गळती



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३



No comments:

Post a Comment