Sunday, January 3, 2021

हात सख्याचा हाती धरुनी

 

डोलीमध्ये बसून आले

हजार स्वप्ने उरी घेउनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी


पहिले वहिले दिवस केवढे

रोमांचांना पांघरायचे!

नजरानजरेनेही साध्या

मनात कांही तरी व्हायचे

विसरायाचे मातपित्याला

यत्न न करता गेले जमुनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी


दिवस संपता संपत नव्हता

रात्र अपूरी पडावयाची

पंख नसोनी घाई होती

क्षितिजापुढती उडावयाची

दोघांच्या या विश्वामध्ये

मंगल सारे गेले घडुनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी


अल्पायुष्यी असावयाचा

शाप असावा आनंदाला

ओहोटी का प्रेमसागरी

अशी लागली दिसावयाला?

अता नव्याने जगू लागलो

नजरेने नजरेस टाळुनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी


उदासवाणा सुरू जाहला

कालखंड हा आयुष्याचा

पुढील रस्ता मलाच आहे

एकएकटे चालायाचा

तगमग इतकी वाढत आहे

स्वप्न भंगते जाग येउनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी


आरसा मला दावत नाही

बिंब नीटसे माझे मजला

लिहावयाला काय जीवनी?

माझ्यावरती कविता गझला

शोध घ्यावया कुठे बघावे?

मीच हरवले माझ्या मधुनी

उंबरठ्यावर माप उलटले

हात सख्याचा हाती धरुनी



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३




No comments:

Post a Comment