ध्येय दिशेने पुढे
जायचे ठरवतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
शहर लखलखीत का
स्वप्न दावते मला
गाव स्वच्छ पण तरी
का न भावते मला?
भले बुरे काय या
संभ्रमात नांदतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
महामार्ग चालता
केवढी चहल पहल!
गाव सोडल्यावरी
मानवेल का बदल?
कल्पना करूनही
श्वास आत कोंडतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
वाट मीच निवडली
दोष का उगा कुणा?
जात जात सोडल्या
मीच माझिया खुणा
कैक युगे लोटली
ध्येय लांब पाहतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
नको मार्ग सागरी
शांतसे जगायचे
संथ जीवनात का
उगाच वादळायचे?
शोधण्यास शांतता
घर शिवार गाठतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
स्वप्न वेगळे पडो
वाटते पुन्हा पुन्हा
चौकटीस तोडणे
विश्व मानते गुन्हा
तरी गाव वापसी
मार्ग फक्त वाटतो
असो अरूंद वाकडी
पायवाट चालतो
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment