मी विश्वासाठी करतो
इतुकीच तुला प्रार्थना
कर पूर्ण जगाची देवा
स्वप्ने अन् मनकामना
ना पुन्हा निर्भया होवो
भयमुक्त असावी नारी
गर्भात स्त्रीभ्रुणालाही
दे कवच कुंडले भारी
आरंभ या जगाचा ती
द्या तिला मानवंदना
कर पुर्ण जगाची देवा
स्वप्ने अन् मनकामना
या हिरव्या धरतीवरचे
तोडती वृक्ष अविचारी
जाहल्या टेकड्या निर्जन
स्वार्थात अंध व्यभिचारी
जागव तू पर्यावरणी
थोडीशीच संवेदना
कर पुर्ण जगाची देवा
स्वप्ने अन् मनकामना
जो पोशिंदा विश्वाचा
का आहे तोच भुकेला
विठ्ठला लक्ष दे, सोडुन
पायीच्या लाल विटेला
का कुणीच शेतकर्यांची
जाणतो न मनभावना
कर पुर्ण जगाची देवा
स्वप्ने अन् मनकामना
मी याचक नाही म्हणुनी
मागतो न माझ्यासाठी
विनवितो गांजल्यांच्या तू
नेहमी असावे पाठी
ही विश्व प्रार्थना घे ना!
ऐकून रघूनंदना
कर पुर्ण जगाची देवा
स्वप्ने अन् मनकामना
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment