ही रीत जीवनाची
की जायचेच पुढती
बघता वळून मागे
डोळे भरून येती
साठीतही वयाच्या
आठवून माय बाबा
येते भरून, सुटतो
अश्रूवरील ताबा
जाज्वल्य घरी बाबा
अन् माय मंद पणती
बघता वळून मागे
डोळे भरून येती
वर्षे मधाळ सारी
तारुण्य बहरलेले
हिंदोळणेच होते
आयुष्य ते नशीले
गंधाळ त्या स्मृतींचे
जपलीत कैक मोती
बघता वळून मागे
डोळे भरून येती
दिसतात सांज छाया
भय ना मला तयाचे
अंधार दाटलेला
आभास हे मनाचे
असतात तेवणार्या
आठव बनून वाती
बघता वळून मागे
डोळे भरून येती
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment