Saturday, December 12, 2020

ह्रदयी वसंत फुलला

त्रास द्यावया इथेच होता ग्रिष्म कसा अन् कुठे हरवला?

दोन  मनांच्या जुळता तारा, लगेच ह्रदयी वसंत फुलला

तारुण्यातिल पदार्पणाने कशी एवढी बदलू शकते!

चिउकाऊच्या गोष्टी सरल्या. राजकुमारालाच पाहते

असे वाटते मुग्ध कळीच्या प्रेमांकुर अंतरी उमलला

दोन  मनांच्या जुळता तारा, लगेच ह्रदयी वसंत फुलला

इतकी नव्हती मातपित्यांना, किती काळजी हल्ली असते 

उशीर होता सातच्यापुढे, माय काळजीने तगमगते

भाव अनामिक अंतरातला असेल का हो तिला समजला?

दोन  मनांच्या जुळता तारा, लगेच ह्रदयी वसंत फुलला

धूर्त माय अन् धूर्त बापही, समजायाचे समजुन गेले

मला एकटी बघून दोघे. लग्नाबद्दल बोलुन गेले

उत्तर दिसले त्यांना गाली, रंग गुलाबी होता खुलला

दोन  मनांच्या जुळता तारा, लगेच ह्रदयी वसंत फुलला

पंख नसोनी निघते आहे ऊंच घ्यावया नभी भरारी

राजपुत्र सोबती असावा, हवी मनाची फक्त तयारी

क्षितिजाच्याही पुढे जगावे, बेत आमुचा आहे ठरला

दोन  मनांच्या जुळता तारा, लगेच ह्रदयी वसंत फुलला

निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment