नवचैतन्य हास्ययोग परिवार, बालेवाडी शाखेतर्फे काल म्हणजे २४.१०.२०१८ रोजी कोजागिरी साजरी केली. यंदाचे कोजागिरी साजरे करण्याचे ४ थे वर्ष होते. या परिवारातील सदस्यांचे घनिष्ट सौहार्दाचे संबंध आणि मनमोकळे वातावरण यामुळे या सोहळ्यात एक अनोखा रंग आपसूक भरतो आणि ही रात्र प्रत्येकाच्या कायम लक्षात रहावी अशी बनते.
धकाधकीच्या शहरी जीवनात वैयक्तीक जिव्हाळ्याचे संबंध लोप पावलेले आहेत. आमचा हा परिवार म्हणजे चंगळवादी जीवनाच्या वाळवंटातील हिरवळ आहे. येथे जो येतो तो मुक्तहस्ते निखळ आनंद लुटतो.
कोजागिरीच्या कार्यक्रमाला तब्बल ११० लोक हजर राहिले आणि तेही काटेकोरपणे वेळ पाळत! सायंकाळी ७.४५ ला सुरू झालेला हा कार्यक्रम असा कांही रंगत गेला की रात्रीचे साडे अकरा केंव्हा वाजले कळलेच नाही. हिंदी, मराठी, राजस्थानी गाणी, नाच, नाटिका, नकला (मिमिक्री) विनोदांचे अल्प सादरीकरण अशा विविध अविष्कारातून कार्यक्रमात रंग भरत गेला. कलाकारांचा उत्साही सहभाग, प्रेक्षकांचा दिलखुलास प्रतिसाद कार्यक्रमाला खूप पोषक ठरले. जवळ जवळ ३५ जणांनी आपली कला सादर केली.
या परिवारात बहुतांश सदस्य ज्येष्ठ नागरीक आहेत. तरीही सर्वांच्या उत्साहाला आलेले उधाण तरुणाईला लाजवणारे होते. सगळ्यात शेवटी सर्व सदस्य उभे राहिले आणि झिंगझिंगझिंगाट या सैराट सिनेमातील गाण्यावर सामुहिक नाचाने कार्यक्रमाचा समारोप झाला. नाचताना आपले वय विसरून ज्येष्ठांनी दाखवलेला उत्साह, एकूणच सळसळणारे वातावरण हे जल्लोषाचे परमोच्च क्षण ठरले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचाच सहभाग होता आणि येथे वैयक्तिक नामनिर्देश अनावश्यक ठरतो.
आजही या कार्यक्रमाची नशा उतरता उतरत नाही. या धुंदीत मला सुचलेली रचना खाली पेश करतोय.
चांदण्यात नाहली
मैफिलीत दु:ख, वेदना क्षणात लोपली
शरद पौर्णिमा स्वतःच चांदण्यात नाहली
ज्येष्ठ जाहले कसे तरूण आज एवढे!
हास्य रेष सुरकुत्यात मनमुराद नांदली
घेतला कवेत चंद्र, चांदण्या नभातल्या
दृष्य हे बघून शारदा हळूच हासली
उत्सवात सर्व धुंद, फुंद जाहल्यामुळे
तार अंतरातली क्षणोक्षणी निनादली
एकटा अशात मी मला कधी न वाटतो
भेटले अनेक मित्र पोकळीच संपली
नाचतोय गीत गात सांजवेळ पण तरी
वाटते तरूण जाहलो नि कात टाकली
बेफिकीर शायरा शिकून घे जगायचे
सोस ऊन खूप खूप शोधण्यास सावली
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment