Wednesday, July 18, 2018

आपुल्या फुलण्यातुनी

( माझी पत्नी सौ. जयश्रीच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता )

बोलती झाली अबोली
आपुल्या फुलण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

बारमाही फूल असते
बहरलेले अंगणी
जर कधी सुकलेच तर ते
दाटतो गुदमर मनी
प्रेमही वेडी अबोली
व्यक्तते रुसण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

चाललेले काय असते?
अंतरी ती जाणते
यत्न करता लपवण्याचा
शस्त्रही ती उपसते
डाव हुकुमी खेळते ती
पापण्या ओलाउनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

सावली होती कधी तर
ऊनही होते कधी
भोगले, आनंद लुटला
साथ खळखळती नदी
काळजी ना वर्तमानी
ना उद्याला पाहुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

वादळे आली नि गेली
राग लोभांची तरी
चालला संसार आहे
काठ त्याला भरजरी
मस्त जगलो स्पष्ट झाले
काळ भुर्र उडण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

मोगरा गंधळलेला
धुंद स्वप्ने कालची
आठवांची मांदियाळी
साथ आहे आजची
छंदवेडा मी हरवतो
नेहमी माझ्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment