Tuesday, July 3, 2018

आनंदाने पुढील अंतर

( माझी पत्नी सौ. जयश्रीच्या  वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता )

काय गवसले, काय हरवले?
करूत चर्चा निवांत नंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

तिच्या रुपाने घरात आले
राग, ताल अन् कैक तराने
नूर घराचा बदलत गेला
गळ्यातल्या परिपक्व स्वराने
मैफिल आयुष्याची सजली
अमूल्य झाले हे स्थित्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

क्षितिजाच्याही पल्याड आम्ही
दोघे सोबत नांदत होतो
जरी हिमालय जमला नाही
पर्वतीवरी सुखात होतो
काबिज केलेल्या स्वप्नांचा
अश्वमेध चालतो निरंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

गरज वाटली कधीच नाही
हास्य लेउनी मिरवायाची
मनी नांदले, तेच गोंदले
आवड नव्हती प्रदर्शनाची
हवे आमुच्या जगास आम्ही
क्षणोक्षणी आले प्रत्त्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

उधारीतल्या सुखास आम्ही
नगदीच्या दु:खात तोलले
संतुष्टीच्या सुपीक रानी
आनंदाचे बीज पेरले
प्रश्न न केला देवांनाही
परावलंबी नव्हते उत्तर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

वटपूजा ना करताही पण
दृढप्रेमाचा प्रत्त्यय येतो
झूळझुळणार्‍या प्रेम प्रवाही
रुढी प्रथांचा व्यत्त्यय येतो
या जन्माचा शेवट होता
म्हणूत झाले हे मध्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment