घेत उसासे समोर बसता
आरशातली करते संगत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
लग्नानंतर प्रथेप्रमाणे
कुलदैवत अन् गोत्र बदलले
समरस होण्या घरात नवख्या
नाव मूळचे जरी विसरले
काळ उलटला, अजून परकी!
बोच कुणाला नाही सांगत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
कुळदिपक हळजायासाठी
मादी होती हवी तयांना
खाणे, कपडा लत्ता, छप्पर
सौद्यामधला जणू बयाना
कूस उजवण्या उशीर होता
विचित्र सारे होते वागत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
जन्म मुलीला देता माझे
संसारातिल पात्र बदलले
घरकामाचे यंत्र जाहले
गात्र नेहमी शिणावलेले
थकलेल्या कायेत सख्याला
मजा येइना, सरली रंगत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
फरपट झाली आयुष्याची
मेले नाही म्हणून जगले
जगण्यासाठी कसे करावे?
बधीर मन हे अचूक शिकले
एकांताने माझ्यासंगे
सदैव केली अंगतपंगत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
अल्लड अवखळ कन्न्या माझी
वाढत आहे कणाकणाने
मला न जे लाभले, तिला ते
मिळो ईश्वरा मणामणाने
तिला सांगते मुक्त रहा तू
तोड चौकटी परंपरागत
घरातल्या गर्दीत नेहमी
माझी असते मलाच सोबत
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment