Sunday, July 3, 2016

ये तशी तू


लाजरी बुजरी नको राहू अशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

पालवी फुटणे मनी का गैर असते?
अंतरीची तार जुळता मन बहरते
व्यक्त होण्या एवढी का लाजशी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू

ना तुझा, हा दोष आहे श्रावणाचा
हा ऋतू असतो सख्याच्या आठवांचा
स्पंदनाना एवढे का लपवसी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू

"काय म्हणतिल लोक"हा तर रोग आहे
रोग कसला?जीवनी हा भोग आहे
तोड बेड्या, हो जराशी धाडसी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

माळ तू केसात झिलमिल तारकांना
चेहर्‍यावर गोंद तू मनभावनांना
व्यक्त हो ओठातुनी, राधा जशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

एकट्याने आज मैफिल मी सजवली
पण शमा का पेटण्या आधीच विझली?
शोधती गझला तुला, बावनकशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

वेळ आली भैरवी छेडावयाची
झडकरी ये ही घडी भेटावयाची
का स्वतःच्या सोबतीने नांदशी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



No comments:

Post a Comment