Saturday, July 30, 2016

ऑल इज वेल

---( संगणक, मोबाईलवर वापरले जाणारे शब्द वापरून एखादी हलकी-फुलकी कविता करावी असा विचार केला; पण विषयाच्या गांभिर्याने पाठ सोडलीच नाही. आज अनुभवतोय की कवितेवर कवीची मनमानी चालतच नाही. ती बंडखोर असते. शेवटी बनलेली कविता जी मी मूळात योजिली नव्हती; ती अशी:- )

मृत्यू हल्ली दारावरची
दाबत असतो बेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

दु:ख वेदना नको नकोशा
सर्व जगाला तरी
कुरुवाळत मी जोजवल्या त्या
सख्या सोयर्‍यापरी
सर्व सुखांचा केला होता
ओ.यल.यक्स. वर सेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

आभासी जगतात आजही
मस्त मस्त रंगतो
सुख जे मिळते, सर्वांना मी
आनंदे सांगतो
दु:ख रडाया वापरला ना
मेसेंजर, ई मेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

सुखे लिहाया संगणाकवर
नाही कुठला फाँट
खाचा, खळगे, मिळतिल काटे
अशी शक्यता दाट
केले रिफ्रेश, तरी न फुलते
आयुष्याची वेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

जिथे आहे मी तिथे चांगला,
ड्रॅग नका ना करू
हाक मारुनी मला बोलवा
गुगल नका वापरू
असून अ‍ॅक्च्यूअल शेजारी
व्हर्च्यूअलची जेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

फॉरमॅटिंग या आयुष्याचे
म्हणजे मृत्यू खरा
ब्लँक संगणक पुढच्या जन्मी
जुन्या, संपती जरा
नवे कनेक्षन, नवीन मेनू
नवा सूर्य उगवेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Thursday, July 21, 2016

मैफिलीत त्या रंग न भरला


तुझ्याविना मल्हार कोरडा
आठवणींच्या धुक्यात विरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

एक जमाना होउन गेला
एक एकटा चालत आहे
व्यक्त व्हायचे कोणा जवळी?
मी माझ्याशी बोलत आहे
असावीस तू येत मागुनी
भास मनीचा भ्रामक ठरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

रंग घेउनी तूच ये सखे
उजाड आयुष्यात भराया
कुंचल्यातुनी हिरवळ थोडी
चितारून दे मला बघाया
वसंत रेंगाळेल भोवती
जरी तयाचा मोसम सरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

शहारणारी स्वप्ने येती
तुला घेउनी भेटायाला
स्वप्न खरे होईल कदाचित
असे लागले वाटायाला
ओढ जिवाला अशी लागली!
ध्यास मनी बस ! तुझाच उरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

कडाडल्यावर वीज, दिसावे
अंधारीही लखलख सारे
तसेच मी बाहूत पाहिले
तू आल्यावर झिलमिल तारे
क्षणात एका नको नकोचा
अधीर पडदा गळून पडला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

पुनवेचे तू आण चांदणे
घेउन येतो मीही दरवळ
रोमांचांना पांघरल्याविन
कशी मिटावी विरही तळमळ?
श्वासांमध्ये श्वास मिसळुनी
स्वर्ग भूवरी म्हणू उतरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला


निशिकांत देशपांड. मो.क्र. ९८९०७ ९९०२३




Wednesday, July 20, 2016

तीज---

{ महाराष्ट्र मे जिस तरह बेटीको नागपंचमीको मायके लाया जाता है, झूले खेलनेका चलन है बिलकुल यही तरहसे पंजाबमे तीज त्योहार मनाया जाता है. इस त्योहारपर "विश्व बेटी दिन" के अवसर पर मेरी एक हिंदी रचना. }

कल तक पलकोंमे बैठी थी
छोटीसी गुडिया रानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

सुनती थी कलतक दिलसे
"एक था कव्वा एक थी चिडिया"
नींद तेरे पलकोंमे आती
सपनोंकी चढती थी सिडियां
खुदके जीवनमेहि दिखे ना
ढुंड ढुंड खुदकी ही निशानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

काली चोटीपर बांधा था
मनभावन एक लाल परांदा
आंगन तू रहते, खुशियोंसे
भरा हुआ था कभी घरोंदा
बिदा किया जब प्रियतम के घर
तनहाई क्या करें बयानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

सजा रखा है घर, आंगन भी
तीजको तू आनेवाली है
दो दिनहि सही लेकिन मायूसी
घरसे गुल होने वाली है
तेरी आहटसे बदली है
हम लोगोंकी बुझी कहानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

कैसे बीते दो दिन सुखके!
बीते क्या? उड गये कहां!
शांती सुखसे मानो जैसे
रिश्ते फिरसे जुडे यहां
माया थी सब दोही दिनकी
लगती थी फिर भी रुहानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

तू झूलें सखियां भी झुलें
झुलेसंग मनभी तो झुलें
तीज मनाने धरतीपर उतरा
चंदरभी अंबरको भूले
डूबी दुनिया मस्त मजे मे
जैसे तीज कि हुयी दिवानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी

आख़िर वह दिन आही गया
जब जाना था घर अपने
हंसी-खुशीसे बिदा किया
पर टूट गये सारे सपने
इंतज़ार था नये तीज का
तब लिखेंगे नयी कहानी
ना जाने कब हुयी अचानक
बिटिया मेरी बडी सयानी



निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, July 17, 2016

धाव धावली

---( पुण्यात विद्यापीठ सिग्नलवर पाहिलेले दृष्य बघून सुचलेली कविता.)

चौरस्त्यावर सिग्नल बघुनी
ब्रेक लावता कार थांबली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

हात पसरुनी करी याचना
तिचा चेहरा केविलवाणा
पेलत होती भार कटीवर
बाळ चिमुकला गोजिरवाणा
हिरवा सिग्नल, गाडी निघता
नैराश्याने खूप ग्रासली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

लाल पुन्हा यावयास सिग्नल
वाट पाहणे तिच्या प्राक्तनी
इक्का-दुक्का शंभरातुनी
भीक टाकतो, अशी कहाणी
तिच्या जीवनी रख रख होती
कधी न दिसली गार सावली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

तिला पाहुनी बर्‍याच वेळा
कुतुहल माझे जागे झाले
आपुलकीने विचारल्यावर
उदास डोळे भरून आले
बोलावी ती म्हणून हाती
पन्नासाची नोट ठेवली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

"माय बाप ना ठाव साहिबा
बाळपणी मज कुणी पळवले
जशी लागले बोलू चालू
भीक मागण्या भाग पाडले
खरे सांगते बालवयातच
जगावयाची भूक संपली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

बाळ सोबती असलेलाही
चोरीचा हा माल असावा
वर्तमान ना भविष्य त्याला
परंतु नाक्की "काल"असावा
दया जागवुन भीक मिळावी
शक्कल नामी कुणी शोधली?
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली

संध्याकाळी जेवण देउन
मालक सारे पैसे नेतो
किती दरारा त्याचा सांगू!
जो तो येथे गप्प बैसतो"
मनातली कवितेत उतरली
सिग्नलवरची म्लान सानुली
गरीब मुलगी भीक मागण्या
कार दिशेने धाव धावली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, July 9, 2016

वणवा वैशाखाचा

आठवणींच्या पुरात येतो
सदैव अनुभव रखरखल्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

भल्या पहाटे ऐकत होतो
जात्यावर आईचे गाणे
साखरझोपेमधील स्वप्ने
बघावयाचा मी नेमाने
वांझोटा का छंद पाळला?
काल, आज मी जगावयाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

क्षणात गट्टी, क्षणात कट्टी
मनी कधी ना राग न हेवा
खुश असायला सर्वासंगे
कारण लागत नव्हते तेंव्हा
मुक्त विहारी धागा तुटला
शाळेमधल्या आयुष्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

जीवनात मग वसंत आला
प्रवेश  होता प्रीय सखीचा
दरवळलेले विश्व पाहिले
मोद आठवे क्षणोक्षणीचा
बघता बघता मोसम सरला
हवा हवासा मोहरण्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

देठ असोनी हिरवा हिरवा
पिकून गेली दोन्ही पाने
मना वाटते झुळूक यावी
गळून जावे क्रमाक्रमाने
मागे, पुढती कोण? कधी? हा
निर्णय असतो दयाघनाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

वर्तमान हा जगावयाचा
काळ असावा, कधी न जमते
भूतकाळ वेताळ रुपाने
पाठीवरचे ओझे असते
गूढ असोनी भविष्य सारे
छंद मनोरे बाधायाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, July 3, 2016

ये तशी तू


लाजरी बुजरी नको राहू अशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

पालवी फुटणे मनी का गैर असते?
अंतरीची तार जुळता मन बहरते
व्यक्त होण्या एवढी का लाजशी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू

ना तुझा, हा दोष आहे श्रावणाचा
हा ऋतू असतो सख्याच्या आठवांचा
स्पंदनाना एवढे का लपवसी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू

"काय म्हणतिल लोक"हा तर रोग आहे
रोग कसला?जीवनी हा भोग आहे
तोड बेड्या, हो जराशी धाडसी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

माळ तू केसात झिलमिल तारकांना
चेहर्‍यावर गोंद तू मनभावनांना
व्यक्त हो ओठातुनी, राधा जशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

एकट्याने आज मैफिल मी सजवली
पण शमा का पेटण्या आधीच विझली?
शोधती गझला तुला, बावनकशी तू
सागराची लाट येते, ये तशी तू

वेळ आली भैरवी छेडावयाची
झडकरी ये ही घडी भेटावयाची
का स्वतःच्या सोबतीने नांदशी तू?
सागराची लाट येते, ये तशी तू


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Saturday, July 2, 2016

बाबांचे बोलणे पहाडी


अनेक वेळा धाकधपटशा
क्वचित प्रसंगी लाडीगोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

शिस्तप्रिय अन् करडा चेहरा
असेच बाबा आठवातले
त्यांच्या विषयी मनात भीती
कधी न कळले वास्तवातले
भावंडाना पदराखाली
माय घेउनी लपवी खोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

कुटुंबाचिया संकट समयी
उभे राहिले बनून कातळ
बाबामध्ये ताकत होती
झेलायाची प्रचंड वादळ
क्षुब्ध सागरी वल्हवायचे
संसाराची लिलया होडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

सासरास मी जशी निघाले
माय ढसढसा होती रडली
पण बाबांची अविचल सूरत
विचित्र होती मला वाटली
बुरूज एकांती ढासळला
कळता सुटली सारी कोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

श्राद्धादिवशी रात्री बाबा
मला भेटण्या होता आला
मायेने माझ्या पाठीवर
हात फिरवुनी मला म्हणाला
"मायाळू बाबाच्या पायी
कठोर कर्तव्याची बेडी"
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

नशीब माझे, मला मिळाला
आईचा भरपूर उबारा
मी घडायला पूरक ठरला
बाबांचा केवढा दरारा!
जन्मोजन्मी हीच मिळावी
मातपित्याची देवा जोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३