संपले आयुष्य सारे चळवळीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
बालपण, तारुण्यही इतिहास झाले
लुप्त आयुष्यातले मधुमास झाले
सूर विरही आर्त बनले मैफिलीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
पाहिले उलटे न काटे चालताना
अन् कधी काळा! तुझे क्षण थांबताना
तेज सरले ध्येय आता काजळीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
आज हा निष्पर्ण एकाकी उभा मी
जाहला निर्जन! असा सवता सुभा मी
पर्व सरले पान हलता सळसळीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
काल होतो काय ही चर्चा कशाला?
वर्तमानी दु:ख मी घेतो उशाला
शक्य तेंव्हा स्वप्न बघतो सावलीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
सोडतो आहे किनारा सागराचा
पौलतीराला इरादा जावयाचा
जन्म नवखा, पर्व नवखे धडपडीचे
गात आहे गीत आता मरगळीचे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment