शुष्क माझिया मनास मोहरून टाक
रंगवून टाक आज रंगवून टाक
आठवात रात्र रात्र फक्त एक ध्यास
वास्तवात एकटीच, काचतात फास
स्वप्न द्यावयास दीप मालवून टाक
रंगवून टाक आज रंगवून टाक
कुंचल्याविनाच चित्र रेखलेय आज
प्रेम रंग वेगळाच खुलवतोय साज
कोरडी कपार ओलसर करून टाक
रंगवून टाक आज रंगवून टाक
शांतता कशी मिळेल सांग वादळात?
बीज अंकुरेल काय भग्न कातळात?
घे मला मिठीत गोड, गदमरून टाल
रंगवून टाक आज रंगवून टाक
चल करू विहार मस्त मस्त सागरात
मी तुझ्यासवे बघेन शुभ्र चांदरात
खास आजची पहाट दरवळून टाक
रंगवून टाक आज रंगवून टाक
चैत्र पालवी कधी न पाहिली वनात
शुष्क वृक्ष भेटले सदैव मी उन्हात
हो वसंत, ग्रिष्म झळा संपवून टाक
रंगवून टाक आज रंगवून टाक
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment