Friday, December 25, 2015

नौशाद--सिनेसंगितातील उत्तुंग व्यक्तीमत्व


गझला, कविता लिहीत लिहीत कांही स्फूट लिखाण करावे असा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात घोळत होता. प्रसंगोचित विषय आज मिळाला. बघू हा प्रकार किती जमतो ते.
२६-१२-१९१९ रोजी एका सनातनी मुस्लीम घरात लखनौ येथे एका मुलाचा जन्म झाला. या बाळाचे पाय कोणालाही तेंव्हा पाळण्यात दिसले नाहीत. कुणालाही कल्पना नव्हती की हे मूल पुढे जाऊन भारताच्या सिनेसंगीत सृष्टीचा अफाट उंचीचा संगीत दिग्दर्शक नौशाद असेल. लखनौ शहराची ख्याती पारंपारिक हिंदुस्तानी संगीत क्षेत्रात सर्वश्रूत आहे. संगीताचे वेड  असलेले लोक या नगरीत शेकड्याने होते आणि आहेत. नौशादला लहान पासून संगिताचे वेड होते. नौशाद यांनी संगिताचे प्राथमिक शिक्षण उस्ताद घुरबत अली, उस्ताद युसुफ अली, आणि उस्ताद बब्बन साहेब यांच्याकडे घेतले. त्यांची संगितातील रुची दिवसेंदिवस वाढत गेली. त्यांना अक्षरशः वेडच लागले संगिताचे. संगीत त्यांचा श्वास बनले.
तो जमाना मूक हिंदी चित्रपटांचा होता. लखनौमधे एक आगळा वेगळा प्रयोग केला जायचा. तबला, हार्मोनियम, सतार आणि व्हायोलीन वाजवाणारे कलाकार आधी हा मूक पट पहात असत. नंतर प्रसंगानुसार म्युझिकचे पीसेस ठरवत असत. सिनेमा सुरू झाला की हे कलाकार सिनेमाच्या पडद्यासमोर बसून म्युझिक वाजवत असत. लोकांनी हा प्रकार आवडल्यामुळे अगदी डोक्यावर घेतला आणि खूप यशस्वी झाला. या टीम मधे नौशाद यांचा सहभाग महत्वाचा असे. अशी त्यांची संगिताची वाटचाल सुरू झाली.
त्यांचे वडील वाहीद अली जे त्या काळात मुन्सिफ (कोर्टातील क्लर्क) होते त्यांना नौशाद यांचे संगिताचे वेड रुचेना. सनातनी विचारसरणीनुसार इस्लाम मधे संगीत निषिध्द मानले जाते. संगीत अंगिकारणे हराम समजले जाते. एकेदिवशी वाहीदा अली यांनी नौशाद यांना बोलाऊन खडसावले आणि त्यांना इशारा दिला की संगीतच जर तुझे ध्येय असेल तर तुला घर सोडावे लागेल.
नौशाद यांनी घर सोडले आणि नशीब काढण्यासाठी थेट मुंबई गाठली. हा काळ त्यांना खूप कठीण गेला. धडपड आणि फक्त धडपड! कांही दिवस त्यांनी रस्त्यावर झोपून पण काढला. हळू हळू जम बसत गेला मेहनत रंग आणू लागली.
स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची पहिली फिल्म होती "प्रेमनगर" जी १९४० मधे रिलीज झाली. पण त्यांना खरा ब्रेक मिळाला तो १९४४ मधे रिलीज झालेल्या "रतन" या फिल्ममुळे. या सिनेमातिल गाणी खूप गाजली.
अजून एक मजेशीर किस्सा असा की, नौशाद यांचे लग्न त्यांच्या वडिलांनी ठरवले. लग्नासाठी नौशाद लखनौ गेल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना तंबी दिली की मुलीकडे अथवा कोणालाही सांगू नकोस की तू संगीतकार आहेस म्हणून! त्यांनी घराण्याची अब्रू राखण्यासाठी सर्वांना सांगितले होते की मुलगा मुंबईला शिवणकाम (टेलरिंग) करतोय म्हणून. नौशाद यांचे दुर्दैव असे की वरातीत बँडवाले रतनची प्रसिध्द झालेली गाणी वाजवत होती; लोक बेभान होऊन नाचत होते. पण नौशाद यांना तोंड उघडायची परवानगी नव्हती. आहे की नाही मजेदार गोष्ट!
नौशाद यांची गाणी लोकसंगीत किंवा रागदारीवर अधारीत असत. त्यांनी जवळ जवळ १०० फिल्म्सना म्युझिक दिले. या माणसाने १९४२ ते १९६० या काळात सिनेफिल्म जगावर आणि रसिकांच्या मनावर राज्य केले. नौशाद कधीही दुय्यम दर्जाचे संगीतकार नव्हते. त्यावेळी पिक्चर्स संगिताच्या जोरावर चालत असत. आजच्या जमान्यात पिक्चर्स एक दोन आठवडे चालातात आणि १०० कोटींच्यावर धंदा करतात. त्यावेळी पिक्चर्स खूप दिवस चालायचे. एकाच चित्रपट गृहात पिक्चर २५ आठवडे चालला की सिल्व्हर ज्युबिली, ५० आठवडे चालला की गोल्डन ज्युबिली, आणि ६० आठवडे चालला की डायमंड ज्युबिली म्हणत. नौशादने संगीत दिलेले तब्बल ३५ सिल्व्हर, १२ गोल्डन आणि ३ डायमंड ज्युबिलीजचे रेकॉर्ड यश संपादन केले.
नौशादने सर्व गायक आणि गायिकांना गाणी दिली. सर्व गीतकारांनाही वापरले. फक्त किशोरकुमार हा एक असा गायक होता ज्याचा आवाज त्याने वापरला नाही. अगदी बोटावर मोजण्या इतपत गाणी असतीलही कदाचित; जी मला माहीत नाहीत.
नौशादच्या नावाने बर्‍याच गोष्टी प्रथम केल्याच्या नोंदी आहेत. त्या पैकी कांही मोजक्याच गोष्टी खाली माहितीस्तव देतो.
१) मदर ईंडिया (१९५७) ही पहिली मूव्ही जिला ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले होते.
२) बैजूबावरा मधील गाणी खूपच गाजली. ही रागावर आधारीत गाणी बनवण्यासाठी त्यांनी प्रसिध्द रागदारी गायक उस्ताद अमीरखान यांची सल्लागार म्हणून मदत घेतली.
३) दिग्गज रागदारी गायक अमीरखान आणि डी.व्ही.पालूसकर यांनी नौशादच्या दिग्दर्शनाखाली प्रथमच सिनेमात गाणे गायले. गाणे--आज गावत मन मेरो झूमके
४) नौशाद यांनी "आन" (१९५३) या सिनेमातील गाण्याला प्रथमच १०० पिसेसचा ऑर्केस्ट्रा वापरला.
५) मुगल-ए-आजम (१९६०)  या सिनेमातील गाणे "है मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्यासाठी १०० .लोकांचा कोरस प्रथमच वापरला गेला.
६) मुगल-ए-आजम याच सिनेमातील अजून एक घटना अजब आहे. प्यार किया तो डरना का या गाण्याच्या कांही भागात एको (प्रतिध्वनी) इफेक्ट आणण्यासाठी एका पुर्ण ग्लेझ्ड टाईल्स असलेल्या बंद बाथरुम मधे लता मंगेशकडून हे गाणे गाऊन घेतले होते.
७) मेरे महेबूब या सिनेमातील टायटल साँगसाठी फक्त सहा वाद्यांचा वापर करण्यात आला.
या अष्टपैलू संगीतकाराला अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील दोन महत्वाचे असे:- १--दादासाहेब फाळके अवार्ड-१९८२ आणि २--पद्म भूषण--१९९२.


नौशाद यांना सहा मुली आणि तीन मुले होती. त्यांच्या एका मुलाने -रहमान नौशाद- दोन पिक्चर्स निर्माण केले होते. १) माय फ्रेंड (१९७४) आणि २) तेरी पायल मेरे गीत (१९८४). या दोन्ही फिल्म्सना नौशाद यांनी संगीत दिले.
१९६० नंतर हिंदी सिनेसंगीतात बदलाचे वारे वाहू लागले. पाश्चात्य संगीताचा प्रभाव प्रकर्षाने जाणवू लागला. फिल्म निर्माते नव्या संगीतकाराच्या मागे धाऊ लागले. नौशाद ज्यांना एकेकाळी जमान्याने /लोकांनी डोक्यावर  घेतले होते, आता दुर्लक्षिले जाऊ लागले. अशा या गुणी आणि स्वत:चा ठसा ठेवणार्‍या संगीतकाराने ०५-०५-२००६ रोजी शेवटचा श्वास घेतला आणि पैगंबरवासी झाले. त्यांना जुहू, मुंबई येथील दफनभूमीत दफन करण्यात आले.
मला नेहमी एक वाटत आले आहे. कलेच्या क्षेत्रात, मग ते संगीत असो की खेळ असो की नाटक असो की नृत्य असो धर्म, जाती, पंथ किंवा सरहदीना पण कुठलेही  स्थान नसते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बैजू बावरा मधील एक गाणे. "मन तरपत हरी दर्शन को आज" गीतकार-शकील बदायुनी, गायक-मोहम्मद रफी, आणि संगीतकार-नौशाद. हे तिघेही मुसलमान असून या गाण्यातून भक्तिरस अक्षरशः ओथंबत आहे. हे गाणे ऐकून कोणताही हिंदू नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे ऐकून आपण या लेखाची समाप्ती करू या.
हे गाणे ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=OyLdgQinxpY


निशिकांत देशपांडे. मो,क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Monday, December 14, 2015

सगळ्यांनी अवर्जून वाचावे असे कांही----( भाग--२ )


मी कांही दिवसापूर्वी वरील शिर्षकाखाली एक लिखाण फेसबुकवर पोस्ट केले होते, त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.अर्थात तो प्रतिसाद माझ्या लिखाणाला नसून मी जो विषय हाताळला होता त्याला होता याची मला पूर्ण जाण आहे. कांही चांगले वाचण्यात आले आणि मनास भिडले की इतरांशी ते शेअर करावे वाटते. आणि हे वाटणे तसे स्वाभावीक आहे. 
थोडे असंबंध वाटेल पण मी माझ्या दोन गझलेतील दोन दोन शेर देतो. जरा लक्ष देऊन वाचावेत. 
१) सत्तेवरती पाप बैसले
   सलाम करण्या पुण्य वाकले

   भ्रुणहत्येच्या सुपारीस का
   डॉक्टरची फी म्हणू लागले? 
२) मी हवा होईन तू हो गंध मातीचा
   दरवळू दे मार्ग अपुल्या वाटचालीचा

   वेदना घोंघावते अंतिम क्षणाला पण
   काळ वसतो डॉक्टरांच्या भरभराटीचा
शायर किंवा कवी हा समाजात रहात असल्यामुळे सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात येणे हे अपरिहार्य आहे. डॉक्टरांच्या पैसे कमावण्याच्या लालसेबद्दल अनेक किस्से सर्वश्रूत आहेतच. अमीरखानच्या "सत्त्यमेव जयते" या एका टीव्हीवरील शो मधून हा विषय खूप प्रभावीपणे हाताळला गेला आहे.  वरील दोन (डॉक्टरावरील) शेरांचा जन्म यातूनच झाला आहे. अजून एक माझा अतिशय जळजळीत शेर याच विषयावर आहे. तो सापडला नाही वर पोस्ट करण्या साठी. मी त्या शेरातून असे म्हटले आहे की या महागाईच्या जमान्यात जगणे तर महाग आहेच पण मरणे त्यावरून महाग आहे; कारण मृत्यूच्या महामार्गावर जागोजागी डॉक्टरांचे टोल नाके आहेत. हे भाव सर्वांच्याच मनात असतात थोड्याफार प्रमाणात.
आपणास वाटत असेल की मी हे सर्व येथे सांगण्याचे प्रयोजन काय? एखादी प्रचलीत गोष्ट घडणे म्हणजे शेअर करण्यासारखी बातमी होऊ शकत नाही. उदा: कोळश्याच्या खाणीत कोळसा सापडणे ही बातमी होऊ शकत नाही. पण त्यात एखादी हिरकणी सापडली तर! नक्कीच सांगण्याजोगी बातमी होते.
मला नेमका हाच अनुभव आला जो मी आपल्यांशी शेअर करत आहे. डॉ. अपर्णा फडके यांच्या वॉलवर मी फेरफटका मारताना कांही खास वाचण्यात आले. या लेखणावरून असे वाटते की अपर्णा या स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असल्या तरीही त्यांच्यातील माणूस आणि माणुसकी सदैव जागी असते. पेशा करत असताना त्यांना जे भावनीक अनुभव येतात ते त्या आपल्या रोजिनिशीत लिहून ठेवतात. आणि ते अनुभव आपल्या फेसबुकच्या वॉलवर पोस्ट करतात. हे लिखाण वाचून मी चकितच झालो. यातून त्यांचे हळूवार मन प्रतिबिंबित होते. प्रसंग साधे आणि छोटे छोटेच आहेत. बघा किती ह्रदयस्पर्षी आहेत ते! मी अपर्णांच्या हळूवार मनाला सलाम करत त्यांचे लिखाण पूर्वानुमतीने देत आहे.

<strong>कळा या लागल्या जीवा " ....(२ )      
थोडेसे रोजनिशीतुन ....
      
सगळे खिसे खाली करून पेशंटच्या नवर्याने काढलेल्या चुरगाळलेल्या नोटा पाहून मनही तेवढेच चुरगाळले गेले ! त्याचं नोटा सिस्टरकडून सरळ करून त्याला परत दिल्या ! नाही घेऊ शकले मी कांही त्यांच्याकडून ..... नोटा सरळ केल्या पण मन तसेच सरळ कसे करू ? हि सामाजिक विसंगती सरळ रेषेत कशी आणू .... 


सुनंदा ..  वय ६० , चेक करताना तिच्या तळहाताच्या खरबरीत स्पर्शाने ह्रुदयासच चरे पडले व नकळत शब्द निघाले ..." किती कष्ट करतेस ग , थोडे तेल लावून झोपत जा रात्री , जरा तरी मऊ पड़तील " ! 
माझ्या तिच्या हातावर फिरणार्या हातास घट्ट पकडून दुसरा हात माझ्याच डोक्यावर ठेवत " माझ लेकरू ग ते , लई मोठ होशील बघ , माझ कष्ट कुठवर तरी  पोहोचल , जाणवल याचाच आनंद लई झाला बघ ! खरच आनंदली होती ती .... कष्टकरी हातातले ते आशीर्वादाचे सामर्थ्य पाहून थक्क झाले मी .. कष्टाने थकलेले हात प्रेमाने मात्र ओथंबतच होते .... कुठे तक्रार नाही , कसले रडगाणे नाही ....कितीकिती शिकावं तिच्याकडून !! 

४० वर्षाची गोड सीमा  .. 
चेक करता करता History विचारली
मिस्टर काय करतात ? 
कान तिच्याकडे होते , , उत्तर नाही म्हणून वर पाहिले .... तर क्षणांत डोळ्यात आसवांची भरलेली विहीरच !! 
तिला सावरणार तेवढ्यात तीरासारखे तिचेच शब्द घुसले ह्रदयात .... 
Mam , ९३ ब्लास्ट मध्ये गेले पहा , मला व दोन छोटया मुलीना एकटे सोडुन .. " चुक कुणाची सज़ा कुणाला , नियतीचा डाव कधि  कळेल का कुणाला " !! 
काय व कशी समजुत घालु -- तिनेच मग डोळे मिटले क्षणभर आणि पापणयानी विहीर बंद करुन टाकली .. हे दिव्य सामर्थ्य फक्त स्त्री मधेच असू शकते .....
अपर्णा .......

Wednesday, December 2, 2015

अताशा रमलो आहे---

पार्श्वभूमी---फेसबुकवर बरेच लोक टिका करतात. आजकाल अशी फॅशन झाली आहे. माझ्या मनात या संबंधात एक विचार आला. जर कुणाच्या हातात आगपेटी असेल तर काडी ओढून देवासमोर समईत ज्योत पेटवता येते. आणि कुणी काडी ओढून एखाद्याच्या घराला आगही लाऊ शकते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. फेसबुकवर चांगले आणि वाईट दोन्हीही आहे. आपण कसा उपयोग करायचा हे आपणच ठरवायचे असते.हा विचार करताना ध्यानात आले की नवोदित कवी आणि लेखकांना फेसबुक एक वरदान आहे. अतिशय उपयोगी माध्यम उपलब्ध आहे. या विचारातून सुचलेली ही कविता. )

होरपळीच्या वास्तवात मी हरलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

दिल्या वेदना ज्यांनी, सारे अपुले होते
खरे कोणते नाते नव्हते, घपले होते
काटेरी झुडुपात आजवर जगलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

एका क्लिकवर माझी सारी मित्र मंडळी
संवादाला तत्पर असते, वेळ अवेळी
सारे माझे मी सार्‍यांचा बनलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

वाढदिनाच्या लाख शुभेच्छा, हॅलो हॅलो
पुष्पगुच्छ पाहुनी अंतरी मी सुखावलो
संगणकावरच्या मित्रांनो! भिजलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

बाड घेउनी कविता, गझलांचे मी फिरतो
प्रतिष्ठितांच्या जगात माझे कोण वाचतो?
फेसबुकवरी दाद किती! मोहरलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

वाङमय चोरी पेस्ट करूनी होऊ शकते
खुशी, चोरण्यायोग्य कुणाला काव्य वाटते !
लुबाडला गेल्यावरतीही हसलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

एकमेव हा मंच नवोदित कवीजनांना
जिथे कारवाँ सदैव दिसतो वावरताना
टिका टिप्पणी वाचुन येथ शिकलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com