Tuesday, March 17, 2015

व्यक्त व्हावया झरते कविता


ओठ न देती साथ परंतू
व्यक्त व्हावया झरते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता

मनोभावना तरारलेली
वसंतातल्या हिरवाईची
असो कहाणी भळभळणार्‍या
उदासवाण्या पानगळीची
कुजबुजायला गूज मनीचे
क्षणात एका, स्मरते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता

प्रशांत समयी उत्तररात्री
रेशिम नाती विणली गेली
ती अन् त्याने मनोभावना
ओठांवरती अंकित केली
चांदणरात्री मोहरणारी
प्राजक्ताने सजते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता

ओंगळवाण्या समाजातले
बलात्कार, स्त्रीभ्रुण हत्त्येचे
चित्र पाहता, अनाथाश्रमी
जगणार्‍या निष्पाप जिवांचे
खदखदणार्‍या आक्रोशाची
धगधगणारी बनते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता

एकोळी, दोनोळी, हायकू.
मिनिस्कर्टचे प्रकार आले
अर्थपूर्ण, लयबध्द काव्य पण
रसिकांनी का पसंद केले?
चारोळ्यांच्या त्सुनामीतही
हिमालयासम टिकते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता

कविता म्हणजे समाजातल्या
परिस्थितीचे बिंब असावे
पुरे जाहले चंद्र, चांदण्या
फक्त कल्पना विश्व नसावे
प्रश्नांशी निगडित असणारी
तळमळणारी असते कविता
ध्यास लागला असा जिवाला
जिकडे तिकडे दिसते कविता


निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Saturday, March 14, 2015

दोन वास्तविक एक काल्पनिक


दोन वास्तविक एक काल्पनिक
रेषांनी का त्रिकोण होतो ?
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो

उजाड ज्याचे विश्व नेहमी
सभोवताली ज्याच्या कातळ
सुप्त जागते मनात आशा
शोधायाची थोडी हिरवळ
या शोधाची झिंग एवढी!
लडखडतानाही धुमारतो
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो

प्रतारणा केलेली नाही
पदोपदी का सिध्द करावे ?
पछाडल्या संशय भूताचे
पाश गळ्याने किती सहावे ?
व्यक्त कराया भाव मनीचे
माझ्या कानी मी कुजबुजतो
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो

संशय तिमिरासमोर इतके
प्रेम असे का फिके पडावे?
अजरामर प्रेमाला घरघर
जरी लागली, आत रडावे
यत्न करोनी ताल पकडता
हाय प्राक्तना! सूर हरवतो
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो

देवळात मी डोळे मिटुनी
काय असे मागितले होते?
माफक आशा, खुशीखुशीने
जगू, तिला सांगितले होते
होतो कोठे? कुठे पोंचलो?
हाच प्रश्न मी मलाच पुसतो
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो

चक्रव्युहाच्या आत जीवाची
चालू आहे तडफड आता
श्वास लागले मंद व्हावया
शेवटची ही पडझड आता
मरावयाच्या अधीच आत्म्या!
आत्मपिंड मी तुला भरवतो
संशय वेलींच्या विळख्यांनी
श्वास जीवनाचा गुदमरतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Sunday, March 1, 2015

माळ गुंफली


तू दिलीस त्या लेखणीतुनी कविता झरली
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

दुष्काळी हृदयात ओलसर कपार झाली
मऊ मुलायम मोरपिसासम  दुपार झाली
सहवासाने सखे स्पंदने किती वाढली!
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

जाहलीस तू सकाळ माझी, सांज प्रहरही
उरली नाही मलाच माझी जरा खबरही
भरकटणार्‍या मनास माझ्या चैन लाभली
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

तुझ्या सोबती बघेन आता वसंत मीही
मळभ संपले स्वच्छ जाहल्या दहा दिशाही
क्षितिजावरती नांदायाची आस उमलली
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

एक फुलांच्या गजर्‍याची तर उणीव होती!
तीच वाटली चूक केवढी भरीव होती!
त्राग्यामधुनी लोभसवाणी सखी भेटली
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

भेट जाहली जरी उशीरा खंत न त्याची
कसर मागची भरून आहे काढायाची
आयुष्याची पहाट नवखी सुरू जाहली
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली

तुझ्याचसाठी अक्षर अक्षर कवितेमधले
माझ्यावरती जरा लिहावे जसे ठरवले
हाय प्राक्तना! कशी नेमकी शाई सरली?
तुझ्या भोवती शब्दफुलांची माळ गुंफली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com