Wednesday, February 11, 2015

कोण असे गंधाळत आहे?


दार घराचे बंद असोनी
कोण अंतरी नांदत आहे?
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?

एक तिच्या झुळुकेने सार्‍या
आयुष्याचा नूर बदलला
निवडुंगाच्या काट्यावरती
कसा शहारा हळूच फुलला?
कोरडवाहू मनात माझ्या
नंदनवन का उमलत आहे?
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?

असे वाटते क्षितिजावरचे
ओसरायला मळभ लागले
केशरलाली बघावयाला
खूप दिसांनी मन आतुरले
दवबिंदूंच्या शिडकाव्याने
स्वप्न नवे अंकूरत आहे
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?

वैफल्याने ग्रस्त एवढा
मी माझ्याशी भांडत असतो
चीड जीवना तुझी एवढी
मीच मला रे! काचत असतो
पीळ मनाचा कुणी उसवला?
गाठ अताशा उकलत आहे
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?

परीघ नाही त्रिकोण नाही
त्रिशंकूच मी जगात होतो
दोघे होतो जरी समांतर
प्रवास केला, भेटत नव्हतो
पडझडलेल्या जीवनासही
कोण असे आकारत आहे
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?

लक्ष लागले पश्चिमेकडे
मावळतीची ओढ जिवाला
पूर्वा का मग पुम्हा एकदा
लुभावते मन परतायाला?
ती आल्याने जगावयाची
आसमनी रेंगाळत आहे
उजाड माझ्या मनी अचानक
कोण असे गंंधाळत आहे?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment