Wednesday, February 11, 2015

अबोल माझ्या मना

शब्द अडकणे हा प्रेमाला शाप असावा जुना
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

कळी उमलते, गंध पसरते, भ्रमराला कळवण्या
"वाट पाहते तुझी सख्या रे!" आर्जव मनवळवण्या
प्रत्येकाची अपुली भाषा, अपुल्या खाणाखुणा
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

नेत्र असू दे लाख बोलके पण झुकलेली नजर
मनी विराजे राजपुत्र जो त्याला नाही खबर
शब्दाविनही प्रेम कळावे कसली संकल्पना?
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

अनादिकालापासुन चंद्रा! तुझी वाट पाहतो
चकोर पण का तुझ्याचसाठी विरहदाह सोसतो?
गाज चकोरा हो! सांगाया मनोप्रेमभावना
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

मोहरते तर कुणी बहरते गुजगोष्टी ऐकता
याच क्षणांची माळ मखमली, सुखावते, ओवता
गोंधळलेल्या मनःस्थितीचा अर्थ जरा लाव ना!
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

नसेल जर का सांगायाला तुला कुणी आपुले
भेटतील तुज प्रवासातही टाक पुढे पाउले
आरशातल्या प्रतिबिंबाला दु:ख तुझे सांग ना!
जरा यत्न कर व्यक्त व्हायचा अबोल माझ्या मना

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment