Wednesday, February 25, 2015

खिसा मोकळा होता कळले

पाठलाग मी उगाच केला
पैशांचा हे आज उमगले
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले

जन्म द्यायच्या अधीच देतो
देव मोजुनी श्वास तरी पण
व्यर्थ काळजी करून होते
आयुष्याची नाहक तणतण
"चोंच जिथे, चाराही असतो"
हे कळले पण नाही वळले
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले

किती मशागत केली होती!
नात्यांची मी जीव लाउनी
मावळतीला कामी यावे
माफक आशा मनी ठेउनी
जगतोयच ना! कसा तरी मी
उडून गेल्यावरती सगळे
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले

हटवाया अंधार, कवडसा
एक पुरेसा असतानाही
सुर्याची का हाव धरावी?
सवालास या उत्तर नाही
शोध सुखाचा घेता घेता
दु:ख वेचती का? हे न कळे
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले

यत्न करोनी घोर निराशा
जेंव्हा जेंव्हा पदरी पडते
"परस्थितीशी जुळवुन घेणे"
जगावयाला तारक ठरते
फाटल्यावरी आकाशाला
किती? कशी? लावावी ठिगळे
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले

जडवुन घेता सवय मनाला
अवघडही पण अवघड नसते
सॉक्रॅटिसचे जीवन जगणे
तसे पाहता सोपे असते
त्रास भयंकर होतो जेंव्हा
सभोवती नांदतात बगळे
उधारीतही जगता येते
खिसा मोकळा होता कळले


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment