Monday, January 26, 2015

वसंतातली हिरवळ सरली


तू गेल्याने वसंतातली हिरवळ सरली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

नाते होते चंद्र, चांदण्या, नभांगणाशी
डेरेदाखल सुखे जाहली कैक उशाशी
आठवणींच्या वावरण्याने चैन हरवली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

अर्ध्यामध्ये हात कुणी का सोडुन गेले?
बघता बघता ओले मन भेगाळुन गेले
कोरडवाहू जीवनात आसवे बरसली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

वस्ती माझी असून परकी परकी वाटे
जाताना तू पेरलेस का आठव काटे
प्रकाशवाटा नव्या शोधल्या, एक न दिसली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

आयुष्याच्या जिथे मैफिली धुंद रंगल्या
त्याच घराच्या भिंती आता धुरकटलेल्या
झपाटलेली वास्तू तुजविन भकास बनली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

कशी जीवना खेळलीस रे विचित्र खेळी !
प्याल्यासंगे नाते जुळले वेळअवेळी
सिगारेटच्या धुरात सारी स्वप्ने विरली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली

व्याख्या प्रेमाची मी नवखी करतो आहे
एक भावना अशी जिच्यावर मरतो आहे
भळभळणारी जरी वेदना, मनी बहरली
उदासीनता आयुष्याला पुरून उरली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




No comments:

Post a Comment